पुणे जिल्हा : नाशिक महामार्गावर होणार व्हाइट टॉपिक

डांबरीकरणावर काँक्रेटिकरणाचे नवे तंत्रज्ञान उपलब्ध – शिंदे
नारायणगाव – पुणे-नाशिक महामार्ग नव्याने तयार होऊन वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर प्रवासाचा वेळ कमी झाला. प्रवास सुखकर झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. परंतु हाच महामार्ग काँक्रिटीकरण (व्हाइट टॉपिक) होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तांत्रिक सल्लागार दिलीप शिंदे यांनी दिली.
डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर काँक्रिटीकरण रस्ता करण्याचे नवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून नव्याने महामार्ग काँक्रिटीकरण करण्यासाठी पनवेल-इंदापूर, अहमदनगर – कल्याण, मुंबई – नाशिक, पुणे – नाशिक व सध्या सुरू असलेला मुंबई अहमदाबाद महामार्गांचा समावेश करण्यात आला आहे.
हा महामार्ग संपूर्णपणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाकडे वर्ग करण्यात आला असून काँक्रिटीकरण करताना कमीत कमी 180 एमएम ते 200 एमएम जाडीचा करण्यात येणार आहे. प्रत्यक्षात काम करताना जड वाहतूक व रहदारीचा विचार करून बदल केला जाईल. काँक्रिटीकरण करताना सेवा रस्ता, गटार आदी अपूर्ण कामे पूर्ण करुन सेवा रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात येणार आहे.
खर्च बचत होणार
पुणे-नाशिक महामार्ग नव्याने करण्यात आलेला असून दर पाच वर्षांनी डांबरीकरण करावा लागणार होता. परंतु काँक्रिटीकरण केल्यानंतर पहिली दहा वर्ष रस्त्याची संपूर्ण जबाबदारी ठेकेदारावर असणार आहे. रस्ता काँक्रिटीकरण असल्यामुळे खड्डे पडणार नाही. त्यामुळे 20 वर्षांत डांबरीकरणाला येणार्या खर्चात बचत होणार आहे.
आठ दिवसांत वर्क ऑर्डर निघणार
पुणे-नाशिक महामार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम एसआरएपीएल कंपनीला देण्यात आले असून येत्या आठ ते दहा दिवसात वर्क ऑर्डर निघणार आहे. मध्यंतरी लोकसभेच्या निवडणुकांमुळे अडथळा निर्माण झाला होता. ठेकेदाराला वर्क ऑर्डर निघाल्यानंतर दोन वर्षांच्या कालावधीत काँक्रिटीकरण पूर्ण करायचे आहे.
बाह्य वळण रस्ते वगळले
महामार्ग काँक्रिटीकरण करण्यासाठी बाह्यवळण रस्ते वगळले आहे. कारण बाह्यवळण रस्त्ये नव्याने तयार करण्यात आले असून रस्त्याची पुढील पाच वर्षांची जबाबदारी ठेकेदाराची असल्याने काँक्रिटीकरण करण्यात येणार नाही. ठेकेदाराची जबाबदारी संपल्यानंतर बाह्यवळण रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.





