Pune District : ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार?

वडापुरी : इंदापूर तालुक्यातील मुदत संपलेल्या वीस ग्रामपंचायतीसाठी वॉर्डातील आरक्षणाची सोडत तसेच सरपंच आरक्षण सोडत नुकतीच झाली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी मतदार याद्याही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत; परंतु निवडणूक कधी लागणार, असा प्रश्न इच्छुक उमेदवारांना पडला आहे.
आरक्षण सोडत झाल्यामुळे व प्रत्येक ग्रामपंचायतीला सरपंच कोण होणार हे सर्व जाहीर झाल्यामुळे ग्रामपंचायतीच्या सदस्य, सरपंच निवडणुकीसाठी अनेकांनी कंबर कसली आहे. काहीजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. गावातील प्रत्येक वाडी, वस्त्यांवर प्रस्तावित उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. ज्या महिलांना सरपंच पदाची संधी आहे त्या महिलांचे पतीराजही आघाडीवर आहेत. मुदत संपून दीड दोन वर्षे झाली असल्याने ग्रामपंचायतवर सध्या प्रशासक काम पाहत आहेत.
त्यामुळे इंदापूर तालुक्यातील वीस ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रत्यक्षात कधी पार पडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. लोकसभा निवडणूक पूर्वी ग्रामपंचायत निवडणूक होईल, अशी अटकळ बांधली जात होती; परंतु लोकसभा निवडणुकीचे कारण देत निवडणुका लांबणीवर गेल्या. त्यामुळे इच्छुकांनी केलेल्या तयारीवर पाणी फिरले.
आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या ग्रामपंचायतीचा पुढारी आपण असलो पाहिजे. ती ग्रामपंचायत आपल्याच गटाच्या ताब्यात पाहिजे अशी राजकीय पुढार्यांची, नेत्यांची, कार्यकर्त्यांची इच्छा असते. ग्रामपंचायतीचे सरपंच पद कोणत्या घटकासाठी आहे ते आपल्या ताब्यात राहण्यासाठी प्रत्येक पक्ष, प्रत्येक कार्यकर्ते आमदारही अगदी मंत्रीही प्रयत्न करतात. आपल्या पक्षाच्या ताब्यात अनेक ग्रामपंचायती असल्या पाहिजेत असाही अनेकांचा होरा असतो. त्यामुळे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष असते.
गाव पातळीवरील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला विशेष महत्त्व आले आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लाखो, कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. उमेदवारांचा प्रत्यक्ष कागदावरचा खर्च नगण्य असतो परंतु प्रत्यक्षातील पडद्यामागचा खर्च कोट्यावधी रुपयांचाही होतो असे वास्तव आहे. हॉटेल, ढाब्यातील जेवणावळीपासून बाकी सर्व प्रकार भेटवस्तु देणे हे सर्व उमेदवार व प्रमुख करत असतात.
एकेक मत महत्त्वाचे
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एका मताला ही महत्त्व असते. एका मतानेही उमेदवार विजयी, पराभूत होत असतो. म्हणून एका, एका मतांची आकडेवारी महत्त्वाची असते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पद व वार्डातील आरक्षणाची सोडत निघाल्यामुळे गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते आतापासूनच प्रचार करू लागले आहेत. दिवसा, रात्री मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. बैठकाही घेत आहे.
हात आखडता
गेली दोन अडीच वर्षांपासून लांबलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुका आधी होणार की ग्रामपंचायत? याची खात्री नसल्याने इच्छुक मात्र खर्चापासून हात आखडता घेत असल्याचे दिसून येत आहे.





