Pune District : आभाळ फाटलं की शेतीचं नशीब ओरबाडतं

वडापुरी : कोणी मका पेरला होता, कुणी केळीचे रोपे लावली होती… कोणाच्या डाळिंबाला फुलं यायला सुरुवात झाली होती… पण 20 मेपासून सुरू झालेल्या वादळी पावसाने ही सगळी स्वप्ने चिखलात मिळवली. शेतांमध्ये आज पीक नाही, झाडं नाहीत… फक्त पाण्याने भरलेली खाचखळगे आणि शेतकर्यांच्या डोळ्यांत पाझरणारे पाणी आहे.
आभाळातून कोसळणार्या पावसाच्या थेंबांमध्ये सुखद शांतता नसून यंदा काळजी, हतबलता आणि अश्रू मिसळलेले आहेत. इंदापूर तालुक्याच्या पूर्व भागात मे महिन्याच्या मध्यापासूनच अवकाळी पावसाने झोडपले असून वडापुरी, भाटनिमगाव, भांडगाव, अवसरी, शहाकांदलगाव, बेडसिंगे या परिसरातील शेतकर्यांच्या माथ्यावर मोठे संकट कोसळले आहे.
मे महिना शेतीच्या मशागतीचा काळ असतो. जमिनीची नांगरणी, ट्रॅक्टरने फाळ मारून पेरणीची तयारी – हे सगळं अगदी वेळेवर व्हावं म्हणून शेतकरी दिवसरात्र झटत होता. पण यंदा निसर्गाने वेगळंच तोंड दाखवलं. हवामान खात्यानं मान्सून येण्यासाठी 7 जूनची तारीख सांगितली होती, पण इथे पावसाने आधीच दार ठोठावलं आणि थेट घरात शिरून सगळंच उध्वस्त करून टाकलं.
भांडगाव येथील शेतकरी तानाजी मोहिते म्हणाले, दहा एकर मक्यावर खर्च केला. खतं, बी-बियाणं, मजुरी सगळं लावलं. आता फक्त हातात कर्जाची चिठ्ठी आणि खचलेलं मन उरलयं. त्यांच्या डोळ्यांत असहायतेची छाया स्पष्ट दिसत होती. दरवर्षी निसर्गाच्या खेळीमध्ये शेतकरीच मातीखाली गाडला जातो. एकदा दुष्काळ, एकदा पाऊस, एकदा गारपीट कोणतीही योजना याच्यावर ठोस संरक्षण देऊ शकत नाही. शेतकर्याच्या श्रमाचं मूल्य केवळ त्याच्या जीवावर ठरतंय, हे अधिक भयानक आहे. आज वडापुरी परिसरात जिथे हिरवळ दिसायची तिथे आता निसर्गाच्या अवकृपेने हिरमुसलेली शेती दिसते आहे आणि त्या शेतीपाठोपाठ हिरावलेले शेतकरी.
बागायतदार उद्ध्वस्त, कांदा शेतातच सडतोय
वडापुरी आणि बेडसिंगे परिसरात केळीचे बागायतदार सर्वाधिक अडचणीत आले आहेत. वर्षभर मेहनत करून वाढवलेल्या झाडांवर एका रात्रीत वादळाने झडप घातली. केळीची उभी बाग झोपली. शहाकांदलगावातील शेतकरी सांगतात, त्यांच्या चार एकर बागेतील तीनशे झाडं जमीनदोस्त झाली आता काय करायचं? या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नाही. त्याचवेळी कांद्याचं पीक सडू लागलं आहे. जे काढलं, त्याला दर नाही. आणि जे शेतात ठेवलं, ते पाण्यात बुडालं. हे दृश्य बघताना शेतकर्यांच्या आयुष्याच्या झाडांवरूनही आशेची पानं गळून पडत आहेत.
पंचनामा सुरू, पण ‘भरपाई’चा शब्द हवेतच
तालुका प्रशासनाने पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू केली आहे, याची माहिती दिली जात आहे. मात्र, शेतकर्यांच्या मते, ही प्रक्रिया हळुचाल आहे आणि भरपाई मिळेल की नाही यावर अजूनही शंका आहे. पावसात भिजलेल्या माणसाला सरकारने थोडं सावरलं पाहिजे. केवळ पाहणी करून उपयोग नाही, तातडीने मदत मिळाली पाहिजे.





