पुणे जिल्हा : जे चुकीचे असेल ते चुकीचे – अजित पवार

चाकण येथे आमदार मोहितेंच्या प्रचारार्थ सभा
राजगुरूनगर – खेड तालुक्यात 2019 च्या निवडणुकीत याच व्यासपीठावर शरद पवार यांनी सांगितले होते, खेड तालुक्यात प्रचंड वाढलेली गुंडगिरी, दहशत मोडून काढण्याची क्षमता केवळ आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यामध्येच आहे. आज मी तुम्हाला सांगतो, आता तुम्ही त्यांना पाच वर्षांसाठी पुन्हा निवडून द्या, दिलीपराव खेड तालुक्यातील गुंडगिरी, दहशत मोडून काढतील. मी पण पोलिसांची मदत देईल, एसपी, डीसीपीला सांगेल. जे चुकीचे असेल ते चुकीचे, कोणी चुकीचे वागत असेल त्यावर आळा घातला जाईल असे खोचक पण डॅशिंग वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
खेड-आळंदी विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार (राष्ट्रवादी काँग्रेस) तथा आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रचार्थ चाकण येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली. यावेळी पवार बोलत होते. यावेळी उमेदवार दिलीप मोहिते पाटील, डॉ. राम गावडे, प्रिया पवार, निर्मला पानसरे, जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, शरद बुट्टे पाटील, कैलास सांडभोर, कैलास लिंभोरे, शांताराम भोसले, अंकुश राक्षे, दिलीप नाईकनवरे, बाजीराव जाधव,
डी. डी. भोसले, पूजा कड, अरुण चौधरी, सुरेखा मोहिते पाटील, जयसिंग दरेकर, विलास कातोरे, विठ्ठल वनघरे, नवनाथ होले, चंद्रकांत इंगवले, संध्या जाधव, नंदा कड, रमेश राळे, पप्पू टोपे, रणजित गाडे, सिद्धार्थ कांबळे, मंगल चांभारे यांच्यासह मोठ्या संख्येने महायुतीचे तालुक्यातील नेते कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, आग्रहाची विनंती आहे हे सर्व महायुतीचे नेते कार्यकर्ते एकत्र आले आहेत. आता काही होणार नाही असे समजू नका निवडणूक कधी एकतर्फी नसते. आपण अतिशय काळजी घेऊन निवडणूक लढा. समोरचा माणूस तुल्यबळ समजून निवडणूक लढवायची असते आचार संहिता पाळून काम करायचे आहे. मी तुम्हाला शब्द देतो. यावेळेस माझ्या सोबत दिलीप मोहिते पाटील याना घेऊन मंत्रिमंडळात घेण्यासाठी कमी पडणार नाही पण तुम्ही लाखाच्या मतांनी त्यांना निवडून द्या.
खेड तालुक्याचा अजित पवारांमुळे मोठा विकास झाला आहे. साडेपाच हजार कोटींचा पाच वर्षात निधी दिला. मी स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे आहे तसा आहे तीन वेळा मला तुम्ही आमदार केले आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराचा राजकीय जन्म दिलीप मोहिते मुळे झाला आहे. तो वारकरी, माळकरी सांगून लोकांची दिशाभूल करीत आहेत.
– दिलीप मोहिते पाटील, आमदार तथा उमेदवार महायुती





