पुणे जिल्हा : बारामती आरटीओला ‘शाबासकीची’ थाप

रस्ते अपघातांचे प्रमाण दहा टक्क्यांनी कमी
जळोची – बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे परिवहन आयुक्तांनी कौतुक करीत बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामगिरी बद्दल ‘शाबासकीची’ थाप दिली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अख्यारीतील बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यात रस्ते अपघातांचे प्रमाण दहा टक्क्यांनी कमी झाले आहे. या कामगिरीबद्दल परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत बारामती कार्यालयाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.
आयुक्त विवेक भिमनवार यांनी येथील कार्यालयाच्या एमएनसी केंद्राच्या बांधकामाची पाहणी केली. या कार्यालयात चालणाऱ्या कामकाजाबाबत आढावा घेतला. बारामती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी आयुक्त भिमनवार यांना माहिती दिली.
गतवर्षी जानेवारी ते जून या कालावधीत बारामती इंदापूर दौंड तालुक्यात २६२ रस्ते अपघात होऊन त्यात १४५ जणांचा बळी गेला होता. यंदा रस्त्यांच्या कामांमुळे अपघातांची संख्या ३२६ वर गेली मात्र जनजागृतीमुळे मृत्यूचे प्रमाण कमी होऊन ते १३२ वर आले. परिवहन आयुक्तांनी रस्ते अपघाताचे प्रमाण घटवण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यात बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने उत्तम कामगिरी केली.
राजेंद्र केसकर म्हणाले की, रस्ते सुरक्षा सप्ताहाची प्रभावी अंमलबजावणी तसेच अन्य कारणांमुळे रस्ते अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश आले आम्ही एम क्यू आर कंपनीच्या सहकार्याने हेल्मेट बाबत जनजागृती केली. अवजड वाहनांचे चालक, एसटी चालक, रिक्षाचालक, विद्यार्थी बस चालक यांच्यासाठी शिबिरे घेतली त्यात चालकांची नेत्र तपासणी, रक्तदाब, मधुमेह आधी तपासण्या करण्यात आल्या. आवश्यक त्या चालकांना चष्मेही वाटप करण्यात आले. यासाठी सरकारने पहिल्यांदाच दोन ते तीन लाखांची तरतूद केल्याने खर्च कमी करणे शक्य झाले.
हेल्मेट’चा वापर वाढला
बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यातील एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये शेकडो कामगार काम करतात. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हेल्मेट शिवाय प्रवास केल्याचे लक्षात आल्यास कार्यालय प्रमुखावर दंडात्मक कारवाईच्या नोटिसा दिल्या. त्याचा परिणाम म्हणून हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या वाढली. तसेच तीनही तालुक्यातील ६५०० शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली.





