Pune District : राजगुरुनगर नगर परिषदेची करवाढ रद्द करण्यासाठी प्रयत्न करू

राजगुरुनगर : राजगुरूनगर नगरपरिषदे सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून नव्याने केलेली कर आकारणी स्थागित करावी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व संबंधित खात्याकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी अॅड, दीपक थिगळे यांनी पुणे म्हाडाचे अध्यक्ष तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भेट घेत केली आहे.
राजगुरूनगर नगरपरिषदेने केलेली करवाढ चुकीच्या पद्धतीने केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. संबंधित कर आकारणीबाबत नागरिकांच्या आलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्थानिक अपील समिती अस्तीत्वात नसल्याने अशा प्रकारे नवीन कर वाढ करणे अत्यंत चुकीचे आहे. पूर्वीच्या करापेक्षा अवाढव्य कर आकारणी केली आहे. त्याच प्रमाणे स्वमालकीची मिळकत व भाडे कररारावरील मिळकत यामध्ये कर आकारणीचे निकष वेगवेगळे लावण्यात आले असल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या अन्यायकारक कर वाढीला शहरातील सर्व नागरिकांनी विरोध दर्शविलेला असून मोठ्या प्रमाणात हरकती घेण्यात आल्या होत्या.
याबाबत अॅड. दीपक थिगळे यांनी संबंधित विभागाच्या मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले होते. त्यावर समाधानकारक उत्तर न भेटल्याने त्यांनी 10 मार्च 2025 पासून उपोषण सुरुवात केली. त्यावर विधिमंडळात आमदार बाबाजी काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर राज्य शासनाच्या वतीने आश्वासन देण्यात आले; मात्र त्यावरही अद्याप निर्णय झाला नाही. हा विषय मार्गी लावण्यासाठी म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची अॅड. थिगळे यांनी भेट घेत चर्चा केली व मागणीचे निवेदन दिले. यावेळी प्रकाश वाडेकर, स्वप्नील माटे, तिन्हेवाडीच्या सरपंच प्रतीक्षा पाचारणे आदी उपस्थित होते.
आढळराव पाटील म्हणाले, राजगुरुनगर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गटकळ यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. त्यांनी कमर्शियल प्रॉपर्टीसाठी करवाढ केल्याचे सांगितले. करवाढबाबत दुरुस्ती केली जाणार आहे; मात्र करवाढ चाकण नगर परिषदेच्या धर्तीवर स्थगिती दिली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. नागरपरिषदांना मोठा निधी मिळतो मात्र हे होत असताना त्यांनी जुजबी करवाढ करणे सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारे आहे. काहींना 48 टक्के करवाढ करणे चुकीचे आहे. त्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न केले जातील. राजगुरुनगर शहराचा पाणी प्रश्न, कचारप्रश्न भयानक आहे. त्याबाबत शासन पातळीवर लक्ष घालून ते सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.





