पुणे जिल्हा : आम्हा ध्यास पंढरीचा अपार…

दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माऊलींचा पालखी सोहळा कर्हेकाठी मुक्कामी
अमोल बनकर
सासवड – आम्हा ध्यास पंढरीचा अपार।
अवघड वाटही होते लीलया पार..!
विठ्ठलाच्या नामाचा अखंडघोष करीत व भक्तीचे भारावलेपण घेऊन पंढरीच्या वाटेवर असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याने मंगळवारी (दि. 2) दिवे घाटातील वारीच्या वाटेवरील सर्वात कठीण टप्पा पार केला. सुमारे दीड ते दोन तास घाटातील वाटचाल पूर्ण करून सोहळा संध्याकाळी दोन दिवसांच्या मुक्कामी सासवडनगरित दाखल झाला.
वैष्णवांसंगती सुख वाटे जीवा।
आणिक मी देवा काही नेणे॥
गाये नाचे उडे आपुलीया छंदे ।
मनाच्या आनंदे आवडीने ॥
असे अभंग म्हणत पुणेकरांचा निरोप घेत टाळ मृदंगाच्या तालावर माऊली.. माऊली.. हा जयघोष करत पालखी सोहळा पुढे सरकत होता. सारे जण विठू नामाच्या भक्तिरसात चिंब होऊन नाचत होते. न्याहारीसाठी पालखी सोहळा वडकी नाक्यावर विसावला होता. न्याहारीनंतर पाच बैलजोडीच्या सहाय्याने माऊलींनी दिवे घाट चढून सायंकाळी 6.30 वाजता पुरंदर तालुक्यात प्रवेश केला. झेंडेवाडी येथील विसाव्याच्या ठिकाणी भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.तर दिवे येथील ग्रामस्थांनी पालखीचे उत्सुर्तपणे स्वागत केले. दिवे फाट्यावर प्रार्थमिक आरोग्य उपकेंद्र दिवे यांच्या वतीने वारकर्याची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत होती.
झेंडेवाडी येथील पुरंदर तालुक्यातील पहिल्या विसाव्याच्या ठिकाणी पालखी विसावली. दिवसभर रिमझीम पाऊस व ढगाळ वातावरण असल्याने वारकरी सुखद पणे मोठ्या आंतराचा हा टप्पा चढताना न थकता दिंडीतील वारकरी अभंग, भारुडे म्हणत एक- एक टप्पा पार करत होते. वारकर्यांमध्ये एक वेगळेच चैतन्य संचाराले होते. विठूनामाच्या भक्तिरसात चिंब होऊन नाचत होते.
पालखी सोहळा दरवर्षी एकादशीला पुरंदर तालुक्यात प्रवेश करतो यावेळी हमखास वरुणराजाचे म्हणजे पावसाचे आगमन होत असते परंतु यावर्षी ढगाळ वातावरण होते. सायंकाळी 7. 30 वजण्याच्या सुमारास पालखी झेंेडेवाडी येथुन निघून सासवड येथील पालखी तळावर 9.30 वजण्याच्या सुमारास विसावली. पालखी दोन दिवस सासवड येथे मुक्कामी आसणार आहे. नगरपरिषदच्या वतीने दोन दिवस मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे.
बाळासाहेब चोपदार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, सोहळा प्रमुख योगिनाथ निरंजन, विश्वस्त राजेंद्र उमाप, भावार्थ डेखळे पालखी सोहळ्यासोबत आहेत. यावेळी पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, माजी राज्यमंत्री दादासाहेब जाधवराव, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार विक्रम राजपूत, गट विकास अधिकारी डॉ. अमिता पवार, सासवडचे पोलीस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी, भाजपा नेते बाबाराजे जाधवराव, झेंडेवाडीचे सरपंच शरद झेंडे, दिवे ग्रामपंचायतीचे सरपंच योगेश काळे, अमित झेंडे, माऊली खटाटे, शिवाजी खटाटे, अजित गोळे, रामदास मेमाणे, सोनाली झेंडे, पुनम झेंडे, कौशल्या झेंडे, पोलीस पाटील सारीका झेंडे, संभाजी जगताप, संतोष गिरमे, सोमनाथ कणसे, बाबुराव गोळे आदी उपस्थित होते.
आज बंधू भेटीनंतर सोपानदेवांचे प्रस्थान
परंपरेनुसार चालत आलेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भेटीनंतर बुधवारी (दि. 3) दुपारी सासवड येथून संत सोपानदेवांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होईल. यासाठी देवस्थानच्या वतीने सर्व तयारी करण्यात आली असून दुपारी सोपानदेव विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघणार आहेत.





