Pune District : पूर्व हवेलीत फेब्रुवारीमध्येच पाणीटंचाई

सोरतापवाडी : या वर्षी पुर्व हवेलीत फेब्रुवारीमध्येच दुष्काळी स्थिती जाणवू लागली असून पाणीटंचाई तीव्र झाली आहे. एकेकाळी सुजलाम सुफलाम असणारा हवेली तालुका आता पाण्याअभावी दुष्काळी वाटू लागला आहे.
पूर्व हवेलीला वरदान ठरलेला नवीन मुळा मुठा कालवा आता बंद केल्याने येणार्या काळात तीव्र पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची टंचाई जाणवणार आहे. पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, मांजरी, शेवाळेवाडी, म्हातोबाची आळंदी, वळती, तरडे, सोरतापवाडी, नायगाव, पेठ, उरुळी कांचन इत्यादी ठिकाणी शेतीच्या पाण्याची बिकट परिस्थिती असून शेकडो एकर शेती पाण्याअभावी पडुन आहे. त्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. त्यातच ज्या शेतकर्यांकडे शेतीसाठी थोडे पाणी आहे. ते शेतीला देताना वीजेचा अडथळा येत आहे. सतत होणार्या विजेच्या लपंडावामुळे विहिरीत पाणी आणि शेती कोरडी अशी अवस्था झाली आहे.
नवीन मुळा मोठा कालवा आता बंद केल्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. वरील गावे ही संपूर्ण कालव्यावर अवलंबून असुन कालवा बंद केल्यामुळे विहिरी व बोअर आटले आहेत. तसेच पूर्व हवेलीतील अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई सुद्धा निर्माण झाली आहे. तर काही गावात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकरी आता कालव्यात पाणी कधी येते याच्या प्रतिक्षेत आहेत. हवेली तालुका हा महानगरपालिकेच्या जवळ असल्याने येथील जमिनीनां सोन्याचा बाजार आहे.
त्यामुळे ओढे, नाले बुजवून त्यावर अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. त्यातच बर्याच ठिकाणी जुने ओढयांवर मोठ्या नळ्या टाकून ओढे बुजून टाकले आहेत. त्यामुळे जमिनीत पाणी मुरणे बंद झाले असून, विहीरीनां व बोअरला पाणीच शिल्लक राहिले नाही. त्यामुळे लवकरात लवकर कालव्यात पाणी सोडावे अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
पूर्व हवेलीत पाणीटंचाई तीव्र असून राहिलेल्या पाण्यात शेतीतील विजेच्या लपंडावामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होत आहे.
-दत्तात्रय चौधरी, प्रगतशील शेतकरी पेठगाव
अनेक वर्षानंतर प्रथमच फेब्रुवारी महिन्यात इतक्या प्रचंड प्रमाणात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून विहीर, बोरवेल व इतर पाण्याचे सोर्स बंद झाले आहेत. शेतकर्यांची पिके जळून जायला लागली आहेत. पाण्याअभावी काही शेतकर्यांनी ऊस जळण्यापेक्षा कुट्टीला दिलेला आहे. तसेच नर्सरी उद्योगावर सुद्धा पाण्याच्या टंचाईची झळ बसत आहे. त्यामुळे आता हजारो एकर जमीन कालवा बंद असल्यामुळे पडून आहे.
-भाऊसाहेब चौधरी, शेतकरी सोरतापवाडी
कालवा सल्लागार समितीच्या बैठक अद्याप झाली नाही. लवकरच ही बैठक होऊन त्यामध्ये पुढील आवर्तन कधी सोडणार हे कळेल. त्याप्रमाणे आवर्तन सोडले जाईल.
-श्वेता कुर्हाडे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग खडकवासला





