Pune District: उजनी धरणाचा जलसाठा निम्म्यावर

मलठण : पुणे, अहिल्यानागरसह सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणाचा जलसाठा निम्म्यावर आला आहे. जसजशा उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत, तशी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची गरज वाढू लागली आहे. उपसा सिंचन, उन्हाळी आवर्तन व पिण्याच्या पाण्यासाठी कालव्याच्या व भीमानदीपात्रातून भरमसाठ पाणी सोडण्यात येत आहे .परिणामी, उजनी धरण्याच्या उपलब्ध पाणीसाठ्यात कमालीची घट होत आहे. त्यामुळे उजनी जलाशयातील पाण्याचे तातडीने व काटेकोरपणे नियोजन करणे अत्यावश्यक आहे.
दरम्यान, दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी शेतकरी, लोकप्रतिनिधी टाहो फोडतात, परंतु यश येत नाही. त्यामुळे या परिस्थितीला जबाबदार असलेली कालवा सल्लागार समिती नेमके करते काय? याप्रश्नी शेतकरीवर्ग सध्या आक्रमक आहे. यावर्षी पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे जिरायती भागासह बागायती क्षेत्रातील शेतकरी सुखावला होता.
गेल्या वर्षी दुष्काळाच्या झळा सोसणारा शेतकरीवर्ग सध्यातरी समाधानी आहे. परंतु जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात उजनी धरणाच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाणीसाठा पन्नास टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. या परिस्थितीमुळे ऐन उन्हाळ्यात उजनीच्या पाण्याचा उन्हाळा होण्यास उशीर लागणार नाही, अशा प्रकारची चिंता उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना वाटत आहे.
उजनी धरणाच्या दैनंदिन मापदंडांचा सारांश, मार्च ४, २०२५:
मुख्य आकडेवारी
१. *पाण्याची पातळी*: ४९४.२७० मीटर (आर डब्ल्यू एल)
२. *पाण्याचा पसरण क्षेत्र*: २६८.०० चौरस किलोमीटर
३. *विशाल साठा*: २५४९.२० दशलक्ष घनमीटर (९०.०१ टीएमसी)
४. *जिवंत साठा*: ७४६.३९ दशलक्ष घनमीटर (२६.३६ टीएमसी)
५. *जिवंत साठा टक्केवारी*: ४९.२०%
प्रवाह आणि बहिर्वाह
१. प्रवाह : पावसाचे प्रमाण : ० मिमी (आज) / ५८३ मिमी (एकूण)
२. बहिर्वाह : बाष्पीकरण: ५.६० मिमी / ०.९० दशलक्ष घनमीटर
केवळ अर्धा टीएमसी पाणी ….
सोलापूर शहरासाठी भीमा नदीपात्रातून साडेपाच ते सहा टीएमसी पाणी सोडण्यात येते. पण यामधील केवळ अर्धा टीएमसी पाणी दोन बंधाऱ्यात साठले जाते. सोलापूर शहरासाठी समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण होऊन योजना कार्यान्वित झाल्यास भीमा नदी पात्रातून पाणी सोडणे बंद होईल, त्यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होऊन भविष्यात शेतीच्या पाण्यासाठी जास्त उपलब्धता होऊ शकते.
दौंड तालुक्यातील भीमा नदीची पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने उजनी धरणग्रस्त शेतकरी चिंताग्रस्त आहे. उपसा सिंचन, कालवा सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याचे योग्य व फेरनियोजन करणे गरजेचे आहे. याप्रश्नी दौंड ,इंदापूर,कर्जत व करमाळा तालुक्यातील लोक प्रतिनिधींनी लक्ष दिले पाहिजे.
– भालचंद्र तुकाराम चव्हाण, ज्येष्ठ शेतकरी, मलठण,तालुका दौंड





