Pune District : वरवंडच्या व्हिक्टोरिया तलावात पाणीसाठा घटतोय

वरवंड : मौजे वरवंड (ता. दौंड) येथील ऐतिहासिक व्हिक्टोरिया तलावातील पाणी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आटत चालल्याने तलाव कोरडा पडत चालला आहे. तलावावर अवलंबून असणाऱ्या १२ गावांच्या पाणी पुरवठा योजना बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तलावात नवीन मुठा उजवा कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत. पाणीटंचाईमुळे कुरकुंभ औद्योगिक वसाहतीवर परिणाम होऊन बारामतीच्या जिरायती भागाला याचा जोरदार फटका बसणार आहे.
वरवंड येथील ऐतिहासिक व्हिक्टोरिया तलाव हा दौंड आणि बारामती तालुक्यातील काही गावांसाठी वरदान समजला आहे. दौंड आणि बारामती तालुक्याच्या जिरायती भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या जानाई- शिरसाई उपसा सिंचन योजना या व्हिक्टोरिया तलावावर अवलंबून आहेत. दौंड तालुक्यातील खोर, पाटस, वरवंड, कुसेगाव, देऊळगाव गाडा, पडवी, कानगाव, कडेठाण या गावांच्या पाणीपुरवठा योजना या तलावावर अवलंबून आहेत.
मात्र, आता उन्हाळ्याच्या दिवसांत तलावातील पाणीसाठा संपत चालला आहे. तलावावर अवलंबून असलेल्या अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना बंद पडत आहेत. त्यामुळे अनेक गावाना पाणी टंचाईचा फटका बसला आहे.
पाणीसाठा संपल्यास याचा फटका शेती, अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना, अनेक कंपन्यांना बसणार आहे. त्यामुळे तलावात जादा पाणी सोडावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.
संग्राम दिवेकर, अनिल पाटील, दत्तात्रय शेळके, दत्तात्रय दिवेकर, विजय दिवेकर, रोहित सासवडे, सतीश राऊत, संदीप दिवेकर, सागर शेळके, रत्नाकर दिवेकर यांनी तलावात पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
कुरकुंभ एमआयडीसीला फटका
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीला देखील पाणी पुरवठा याच तलावावरून केला जातो. तलावातील पाणीसाठा आटल्याने कुरकुंभ औद्योगिक वसाहत, वायनरी प्रकल्पाला होणारा पाणी पुरवठा देखील पूर्ण बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तलावाची पाणी साठवण क्षमता ही दोनशे दशलक्ष घनफुट इतकी आहे. तलावात मोठया प्रमाणात पाण्याचा साठा असतो. तलावात पाटबंधारे खात्याकडून पाणी सोडले जाते. मात्र, तलाव कोरडा पडत चालल्याने पाटबंधारे खात्याकडून दखल घेतली जात नाही आहे.





