Pune District : माऊलींच्या स्वागतला वाल्हेकर सज्ज

पालखी सोहळा उद्या मुक्कामी : प्रशस्थ असा पालखी तळ सजला
वाल्हे – खंडोबाच्या जेजुरी नगरीतून बुधवार(दि.25) माऊलींचा पालखी सोहळा महर्षि वाल्मिकी ऋर्षीच्या वाल्हे गावाकडे प्रस्थान होणार असून आद्यरामायणकारांच्या वाल्मिकी नगरीत माऊलींच्या स्वागतासाठी वाल्हेकर सज्ज झाले आहेत.
या पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांसाठी सोईसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासकीय पातळीवर जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार,जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी,पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे, पुणे विभागाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, कार्यकारी अभियंता अनुराधा भंडारे, प्रांताधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत,
गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ,उपविभाग पोलीस अधिकारी तानाजी बरडे, उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग स्वाती दहिवाल, जेजुरी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे, आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम काळे, आळंदी देवसंस्थान व पालखी सोहळा समितीचे विश्वस्त, तसेच विविध विभागांच्या अधिकार्यांनी वाल्हे येथील पालखी तळावर भेट देऊन विविध सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगानेच,वाल्हे येथे ग्रामपंचायतीच्या तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून वाल्हे परिसरातील 30 विहिरीत व 7 सार्वजनिक पाण्याच्या टाक्याचे जलशुद्धीकरण करून सुमारे 32 हॉटेलातील तपासणी करण्यात आली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत गावांतील हॉटेल, दुकानदार यांना पदार्थ उघडे ठेऊ नये आणि पाणी स्वच्छ व शुद्ध ठेवण्यासंदर्भात सूचना करून त्यांची तपासणी करण्यात आल्याचे पर्यवेक्षिका संजीवनी दरे, आरोग्य सहाय्यक रवींद्र मोहिते यांनी सांगितले. पालखी सोहळ्यातील वारकर्यांसाठी ठिक-ठिकाणी अन्नदान,फराळ,चहा वाटप केले जाणार आहे.तसेच पालखी तळावर वारकर्यांसाठी पिण्याचे पाणी,अंघोळीचे पाणी,आरोग्य, विद्युतपुरवठा,मोबाईल चार्जिंग सुविधा,शौचालय युनिट आदी सुविधि उपलब्ध होणार आहे.
वाल्हे ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने परिसरातील सर्व विहिरी व पाण्याच्या टाक्यांमध्ये टीसीएल टाकण्यात आले आहे.ग्रामपंचायती मार्फत पालखीतळावर आवश्यक सपाटीकरण करुन वाळू व कच टाकुन सुशोभिकरण करण्यात आले असून पालखी मैदानातील हायमास्ट दिवे तपासणी झाली असून,मंगळवारी संध्याकाळपासून हायमास्ट दिवे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच अतुल गायकवाड यांनी दिली.
8 ठिकाणी टँकर भरण्यासाठी पॉईंट
शासनाच्या वतीने सुमारे 1800 मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून देण्यात आली आहेत.पालखी तळावरील विद्युत पुरवठयाची कामे अंतीम टप्प्यात आहेत.वाल्हे गावापासून ते पालखी मैदान या रस्त्यांच्या दरम्यान,महिलांसाठी 14 ठिकाणी स्वच्छतागृह ठेवण्यात आली आहेत.10 ठिकाणी कचरा कुंडीची व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच 8 ठिकाणी टँकर भरण्यासाठी पॉईंट उपलब्ध करून देण्यात आल्याची आहे.हिरकणी कक्ष,विश्रांती कक्ष,आरोग्य कक्ष यांची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.पालखी मैदानातील काटेरी झाडे-झुडपे काढून सपाटीकरण करण्यात आले आहे.तसेच डासांसाठी धूर फवारणी करण्यात येत आहे.अशी माहिती,सरपंच अतुल गायकवाड यांनी दिली.





