पुणे जिल्हा : मतदार विरोधकांना करारा जबाब देणार

आमदार अतुल बेनके : उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
नारायणगाव – जुन्नर तालुका छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार व वारसा लाभलेला तालुका आहे. तालुक्यातील वारकरी संप्रदायाचा विचार जपण्याची संस्कृती जपण्याचे काम स्व. वल्लभ बेनके यांच्या नंतर मी करीत आहे आणि पुढेही करीत राहीन. तालुक्यातील कानाकोपर्यातून मला मिळणारा पाठिंबा बघता देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात काहीही जरी घडले असले, तरी जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून अतुल बेनकेच पाहिजे, अशी लोकभावना निर्माण झाली असून विधानसभा निवडणुकीत मतदार विरोधकांना करारा जबाब देणार, असे आमदार अतुल बेनके यांनी म्हटले आहे.
जुन्नर तालुक्यातील सर्व समाज घटकांना एकत्र घेऊन महायुतीतील घटक पक्षांशी एकत्रित समन्वय झाल्यानंतर पदाधिकार्यांच्या व महिलांच्या हस्ते सोमवारी (दि. 28) उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे शनिवारी (दि. 26) घेतलेल्या पत्रकारपरिषदेत आमदार बेनके यांनी नमूद केले.
आमदार बेनके म्हणाले की, आमदार म्हणून मी पाच वर्षे जनतेची प्रामाणिकपणे सेवा करीत आलो आहे. विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांच्या गावामध्ये जनतेच्या हितासाठी काम करण्याचा प्रयत्न केला आहे. तालुक्यातील विकासाची कामे काही प्रमाणात राहून गेली असतील, परंतु पुढील काळात पूर्ण केली जातील. माझ्यावर विश्वास ठेवून उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जुन्नर तालुक्याची उमेदवारी मला दिली तो विश्वास मी सार्थ करीन याची खात्री आहे. स्व. वल्लभ बेनके यांची जुन्नर तालुक्याच्या विकासाची राहिलेले कामे पूर्ण करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. सिंचन, पाईपलाईन, पर्यटनाचे प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे नमूद केले. जुन्नर तालुक्यातील पाण्याचा संघर्ष अजूनही संपलेला नाही. अणे पठारावर 76 लाख रुपये मंजूर करून डीपीआर तयार करण्याच्या कामास मंजुरी मिळाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
आमदार बेनके यांनी जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी 3300 कोटीचा निधी आणला आहे. जुन्नर शहराच्या विकासासाठी नगरपरिषदेला आजपर्यंत न मिळालेला 60 ते 70 कोटीचा निधी मिळवून दिला. जुन्नर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील मुस्लीम बांधवांना भक्कमपणे आधार दिला. आदिवासी बांधवांसाठी हिरडा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी 14 कोटीचा निधी दिला. जुन्नर तालुक्याला पाणी कमी पडू नये यासाठी आमदारातील बेनके यांनी योग्य नियोजन केलेे.
– संजय काळे, सभापती, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती
आमदार अतुल बेनके यांचा उमेदवारी अर्ज भरताना महायुतीतील सर्व घटक पक्ष बेनके यांना समर्थन देण्यासाठी उपस्थित राहतील. मागील पाच वर्षांत तालुक्यात विकासाची कामे केली, त्या कामाच्या जोरावर आम्हाला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे निरीक्षक आणि समन्वयक नेमण्यात आले असून 33 हजार मतांचे मताधिक्य घेऊन अतुल बेनके विजयी होतील.
– पांडुरंग पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी, जुन्नर तालुका





