Pune District : पंढरीच्या विठोबा रे आता नको ढगफुटी…

वारकरी म्हणतात दिवे घाट वैष्णवांच्या दिंड्या-पताकांनी सजू दे
संभाजी महामुनी
दिवे –
पंढरीच्या विठोबा रे, आता नको ढगफुटी ।
आता लोटेल सागर, ज्ञाना तुकोबांसाठी ॥
तुझे आभाळाचे दान, देई अभंग प्रमाण ।
ओत इतुक्याच धारा, पालख्यांना लिंबलोण ॥
गजभार दाटू दे रे, दिंड्या पताका अलोट ।
शुभ्र वैष्णवी फुलांनी, सजू दे रे दिवे घाट ॥
आषाढी वारीचा सोहळा आता काही दिवसांवर आला आहे. लाखो वारकर्यांना विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागली आहे. कधी एकदा पंढरपूरला जातो आणि लाडक्या विठूरायाला डोळे भरून पाहतो असे झाले आहे. मात्र राज्यात सर्वत्र पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे आता पाऊस नको, आता संपूर्ण रस्ते दिंड्या पताकांच्या अलोट गर्दीने फुलून जाऊ दे आणि दिंड्या पताकांच्या वैष्णवी रुपी फुलांनी संपूर्ण दिवे घाट सजू दे. अशी कळकळीची विनवणी वारकरी विठूरायाला करीत आहेत. वारकर्यांच्या मनातील सुरू असलेली घालमेल आणि पांडुरंगा बद्दल असलेली निष्ठा सासवडमधील कवी अनिल कदम यांनी त्यांच्या कवितेतून व्यक्त केली आहे.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे श्रीक्षेत्र देहू येथून बुधवारी (दि. 18) पंढरपूरकडे प्रस्थान होत असून गुरुवारी (दि. 19) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे क्षेत्र आळंदी येथून प्रस्थान सुरु होत आहे. रविवारी (दि. 22) माऊलींचा सोहळा ऐतिहासिक दिवे घाटातून पुरंदर तालुक्यात प्रवेश होत आहे.
दिवे घाटातील अवर्णनीय सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी लाखो वारकरी आणि भाविक आसुसलेले असतात. त्यामुळे दुपारी वडकी येथून सोहळ्याचे प्रस्थान सुरु होताच संपूर्ण घाट भाविकांच्या गर्दीने अक्षरशः फुलून जातो; परंतु यंदा सर्वत्र अतिवृष्टी झाली असून अद्यापही पाऊस सुरूच आहे. जिकडे तिकडे पाऊस, चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. अशा परिस्थितीत वारी कशी करायची ? असा प्रश्न वारकर्यांसमोर उभा राहिला आहे.
त्यामुळे आता पाऊस नको. ज्ञानोबा, तुकोबांसाठी वारकर्यांचा महासागर बाहेर पडणार आहे. दिवे घाट वैष्णवांच्या दिंड्या पताकांनी सजू दे. घाटात टाळकर्यांचा नाद आणि पखवाज घुमू दे. आम्हाला आता पाऊस नको तर देवाचा सोहळा पाहू दे एवढेच लाड पुरव, अशी सार्थ हाक वारकरी घालीत आहेत.





