पुणे जिल्हा : चांबळीत श्रीरामाच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा

पालखी सजवली बहूरंगी फुलांनी
गराडे – अयोध्या येथे रामलल्ला प्रणतिष्ठापनेनिमित्त चांबळी (ता. पुरंदर) येथे सोमवारी (दि. 22) सकाळी श्रीराम मंदिरातील श्रीराम, लक्ष्मण व सीता माता यांना पहाटे अभिषेक घालण्यात आला.
त्यानंतर आरती करून मंदिर नागरिकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. बहूरंगी फुलांनी सजविण्यात आलेल्या पालखीत श्रीराम प्रभूच्या चांदीच्या पादुका व प्रतिमा ठेवण्यात आली. त्यानंतर पादुका व प्रतिमेचे पूजन करून पालखीने ग्रामप्रदक्षिणेसाठी प्रस्थान ठेवले.
चांबळी ऑफिस येथून या मिरवणुकीला सुरुवात झाली. बँड पथकाच्या तालावर 200 ते 250 महिलांनी डोक्यावर पाण्याने भरलेले कलश व काही महिलांनी तुळशी वृंदावन घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला होता. मिरवणूक जिल्हा बँक, गराडे कोडीत रस्ता मार्गे बाणेश्वर मंदिर, दत्त मंदिर, भैरवनाथ मंदिर, बोरी चौक मार्गे श्री राम मंदिर अशी काढण्यात आली होती.
महिलांनी डोक्यावर कलशातून आणलेल्या पाण्याने श्रीरामाच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. त्यानंतर जोगदंड महाराज पंढरपूरकर यांचे रामचरित्रावर काल्याचे कीर्तन झाले. मस्कू महाराज कामठे यांनी व्यासपीठ नियोजन केले होते. यावेळी बारामती लोकसभा निवडणूक प्रमुख जालिंदर कामठे, सरपंच प्रतिभा कदम, रामेश्वर मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कामठे, माजी सरपंच संजय कामठे, संजय शेंडकर, पोलीस पाटील विश्वनाथ शेंडकर, मारुती कामठे,
शहाजी कामठे, राजेश कामठे, शिवदत्त कामठे, कृषी उत्पन्न बाजार समिती पुरंदरचे संचालक वामन कामठे, किशोर कामठे, संदीप कामठे, भाऊसाहेब कामठे, रघुनाथ कामठे, मोहन कामठे, जगन्नाथ शेंडकर, शरद कामठे आदींनी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. तर यावेळी ग्रामस्थांसाठी म्हाप्रसादाचे नियोजन पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे नेते जालिंद्र कामठे यांनी केले होते.





