Pune District : विघ्नहर कारखाना ऑक्टोबरमध्ये गाळपासाठी सज्ज

अध्यक्ष सत्यशील शेरकर : मील रोलर पूजन उत्साहात
ओझर – जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा आगामी गाळप हंगाम 2025-26 साठी मशिनरी देखभाल व दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असून ऑक्टोबर महिन्यामध्ये कारखाना गाळपासाठी सज्ज होणार असल्याची माहिती काराखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली.
कारखान्याच्या गाळप हंगाम 2025-26 करीताचे मील रोलरचे पूजन शनिवारी (दि. 12) सकाळी 10 वाजता सर्व संचालक मंडळ, सदस्यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात पार पडला, त्यावेळी शेरकर बोलत होते. याप्रसंगी उपाध्यक्ष अशोक घोलप, कार्यकारी संचालक भास्कर घुले, सर्व संचालक मंडळ, सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अध्यक्ष शेरकर म्हणाले की, कारखान्याच्या सहवीजनिर्मीती व डिस्टीलरी प्रकल्पांची कामेही वेगामध्ये सुरू आहेत. यंदा ऊस लागवडीकडे शेतकरी वर्गाचा मोठ्या प्रमाणावर कल आहे. ऊस उत्पादक शेतकर्यांना विघ्नहर कारखान्याची बेणे पुरविण्याची प्रक्रिया सुरु असून शेतकर्यांचा आडसाली ऊस लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर कल आहे.
कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता 5 हजार टनावरुन 7 हजार 500 टन झाल्याने गाळप हंगाम 2025-26पासुन कारखाना प्रतीदिन 8 हजार 500 ते 9 हजार टन ऊसाचे गाळप करणार आहे. ऊस गाळप हंगामात कारखान्याचे सुमारे 13 लाख टनापेक्षा जास्त गाळपाचे उद्दिष्ट राहणार आहे. गळीत हंगामासाठी ऊस तोडणी वाहतूक लेबरचे नियोजनानुसार कराराचे काम सुरू आहे. त्याचबरोबर विघ्नहर कारखान्याचा 65 केएलपीडी क्षमतेचा महत्वकांक्षी असा डिस्टीलरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.





