Pune District : अनास्थेचे बळी… कामगाराचा मृतदेह कंपनी गेटवर

पुणे : जिल्ह्यात शिक्रापूर आणि पुरंदर तालुक्यातील सोमर्डी येथील खून प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईकांचा संताप अनावर झाला. यात शिक्रापूर येथील ट्रिनिटी कंपनीच्या विरोधात कंपनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत नातेवाईक, कामगारांनी मृतदेह कंपनीच्या गेटवर आणून ठेवला. तर सोमर्डी येथील खूनप्रकरणातील एकाचा उपचारादरम्यान पुण्यात मृत्यू झाला. कुटुंबीय आणि नातेवाईकांनी सासवड पोलीस ठाण्यात मृतदेह आणून आरोपींच्या अटकेची मागणी केली. यावेळी पालखी सोहळा सासवड शहरात दाखल होत असताना पोलिसांची दमछाक झाली. यात कायदा- सुव्यवस्था आणि कंपनी प्रशासनाच्या अनास्थेचे बळी ठरलेल्या घटना रविवारची पहाट जिल्ह्यात घातवार ठरली.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मृत्यू : शिक्रापुरात नातेवाईकांचा आरोप
शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ट्रिनिटी इंडिया फोर्जटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये कामावर आलेल्या कामगाराला त्रास झाल्यानतर कंपनी प्रशासनाकडून झालेल्या दुर्लक्षमुळे कामगाराचा मृत्यू झाल्याने अन्य कामगार व नातेवाईकांनी मृत कामगाराचा मृतदेह कंपनीच्या गेटवर ठेवत कंपनी प्रशासनाचा निषेध व्यक्त करीत आंदोलन केले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मृत्यू झालेल्या कामगाराचा मृतदेह अंत्यविधीसाठी नेण्यात आला आहे.
शिक्रापूर येथील ट्रिनिटी इंडिया फोर्जटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये कायमस्वरूपी कामगार असलेला रामपाल दुशद हा कामावर आलेला असताना (दि.१६) त्याची प्रकृती खालावली. दरम्यान, त्याला उपचारासाठी नेण्यासाठी कंपनीकडे रुग्णवाहिका नसल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी एक तास उशीर झाला. यात रामपाल याची प्रकृती गंभीर झाली. त्याला उपचारासाठी वाघोली येथे हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अखेर (दि.२१) रोजी रामपाल याचा मृत्यू झाला. अन्य कामगार व नातेवाईक संतप्त झाले. त्यामुळे रविवार (दि.२२) सकाळी कामगार व नातेवाईकांनी रामपाल याचा मृतदेह कंपनीच्या गेटवर ठेवत कंपनी प्रशासनाचा निषेध व्यक्त करीत आंदोलन केले.
कंपनीच्या गेटवर घोषणाबाजी सुरु होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख, पोलीस हवालदार संदीप कारंडे, दामोदर होळकर, महिला पोलीस शिपाई पल्लवी वाघोले यांनी घटनास्थळी भेट कामगार व नातेवाईकांशी चर्चा करत घटनेबाबत तक्रार द्या आम्ही कारवाई करु असे आश्वासन दिल्याने अखेर पोलिसांच्या मध्यस्तीने मृत कामगारावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, यावेळी कामगारांनी कंपनी प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली. कंपनी प्रशासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी एकमेकाकडे बोट दाखवत बोलणे देखील टाळले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष जयेश शिंदे व क्रांतिवीर प्रतिष्ठानचे सणसवाडी अध्यक्ष सागर दरेकर यांनी कंपनीमध्ये भेट देत कंपनीमध्ये चारशे कामगार असताना एकाही रुग्णवाहिका नसल्याचे पाहून नाराजी व्यक्त करीत कंपनी प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल न झाल्यास आम्ही आक्रमक पवित्रा घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
कंपनीने चक्क पोलिसांना माहिती देणे टाळले
शिक्रापूर येथील ट्रिनिटी इंडिया फोर्जटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये कामगार व नातेवाईकांनी कंपनीच्या गेटवर मृतदेह आणून ठेवत आंदोलन सुरु केले. तासभर कंपनी प्रशासनाने चक्क पोलिसांना माहिती देणे देखील टाळले असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
तक्रार आल्यास कारवाई
शिक्रापूर येथील कंपनीसमोर घडलेल्या प्रकारानंतर आम्ही तातडीने भेट देऊन कामगार व मयताचे नातेवाईक यांच्याशी चर्चेनंतर अंत्यविधी पार पडला असून त्याबाबत तक्रार आल्यास योग्य कारवाई केली जाईल असे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख यांनी सांगितले.





