यवत : प्रसूती पूर्वकाळात गर्भलिंग निदान चाचणी करणे कायद्याने गुन्हा असून हा शिक्षेस पात्र गुन्हा आहे. गेल्या ३० वर्षांत मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी होत आहे. गर्भलिंग निदान चाचणीबाबत प्रबोधन आणि जनजागृतीचा गाजावाजा केला जात आहे. तरी देखील चिंतेत भर टाकणाऱ्या गंभीर बाबीकडे अधिकारी, यंत्रणा गांभीर्याने घेत नसल्याने अधिकारी मात्र डोळ्यावर पट्टी बांधून गांधारीची भूमिका वठवत आहेत. गर्भलिंग निदान चाचणी व गर्भपात करण्याची बंदी असताना देखील सर्रासपणे परदेशी बनावटीचे सोनोग्राफी मशिन आणि जुन्या बिघाड असलेल्या बंद सोनोग्राफी मशीन वापरून गर्भलिंग निदान करून गर्भपात केला जात आहे. यात दौंड तालुक्याचे नाव राज्यात चर्चेत आले आहे. वंशाला दिवा हवा, अशी आस असलेल्या माता- पित्यांना ही नकोशी ‘मोकळी’ करण्यासाठी दौंड हा पर्याय ठरू लागला आहे. काही दिवसांपूर्वी दौंड तालुक्यातील शहरी भागात बोरावकेनगर – गोपाळवाडी येथे भर लोकवस्तीमधील आणि गजबजलेल्या ठिकाणी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सहा प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये मृत अर्भक व मानवी अवयव आढळून आले होते. त्यानंतर गर्भलिंग निदानाची बेकायदा चाचणी केली जात असल्याचा भांडाफोड झाला. याप्रकरणी दौंड पोलिसांत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संतापजनक प्रकरणामुळे दौंड तालुका सध्या महाराष्ट्रभर गाजत आहे. पुन्हा दौंड तालुक्यात अनधिकृत गर्भलिंग निदान व गर्भपात केंद्राचा सुळसुळाट झाल्याची चर्चा राज्यभर सुरु झाली आहे. यामध्ये काही दलाल लोक हाताशी धरून काहींनी लागेबांधे जुळवून तालुक्यासह परराज्यात आणि इतर जिल्हात देखील जाळे खोलवर विस्तारले आहे. हा लुटीचा आणि गर्भातच कोवळ्या कळ्या खुडण्याचा गोरखधंदा भरदिवसा सुरु आहे. मात्र, संबंधित विभागाचे अधिकारी यांनी गांधारीची भूमिका बजावत मौन पाळले आहे, असा सूर स्वाभिमानी दौंडकरांमधून उमटत आहे. सधन गावाचा लौकीक अन् दौंड तालुक्यातील एका मोठ्या लोकसंख्येच्या सधन गावात हे सोनोग्राफी सेंटर चर्चेचा विषय बनले आहे. त्याठिकाणी परजिल्हा, परराज्यातून रुग्ण सोनोग्राफीसाठी येत असल्याची चर्चा नागरिक करीत आहेत. प्रगत आणि वैज्ञानिक युगात वावरत असताना देखील याठिकाणी सोनोग्राफी केंद्रावर बाहेरील जिल्ह्यातील कराड, सातारा, सांगली, मराठवाडा, कर्नाटकसह परराज्यातून देखील येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असल्याने स्थानिक नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. हजारो किलोमीटर अंतर कापून याच सोनोग्राफी केंद्र निवडण्याचे कारण नक्कीच काय, हा संशोधनाचा आणि तपासाचा विषय आहे. दौंड तालुक्यातील एका नदीकाठावरील सधन आणि बागायत गावांत हे बेकायदा सोनोग्राफी सेंटर आहे. गर्भवती महिलांची प्रसुतीपूर्व लिंग निदान चाचणी करण्यासाठी अनेक दलाल नेमले आहेत. गर्भलिंग निदान करण्यासाठी पंचवीस ते पन्नास हजार रुपये आकारात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दलालांची मोठी चांदी होऊ लागली आहे. यांचा हा गोरखधंदा सुसाट सुरु आहे. लिंग निदान चाचणीत सांकेतिक भाषा गर्भलिंग निदान चाचणीनंतर सांकेतिक भाषेतून स्त्री – पुरुष असल्याचा निरोप याच नेमलेल्या दलालांमार्फत किंवा आलेल्या रुग्णांना दिला जात असल्याचे बोलले जात आहे. देवधर्माची नावे देऊन निदान सांगितले जात आहे. याठिकाणी सोनोग्राफी करताना कोऱ्या कागदावर रुग्णाच्या सह्या घेतल्या जात आहेत. मात्र, यावर कोणी बोलत नाहीत. बेकायदा गर्भलिंग निदान, गर्भपात करण्यासाठी दौंड तालुक्यात बाहेरील जिल्ह्यातील आणि राज्यासह परराज्यातील रुग्णांची वर्दळ वाढली असल्याचे त्या वादग्रस्त सोनोग्राफी केंद्रावर दिसत आहे. तालुक्यातील सर्वच सोनोग्राफी केंद्राची चौकशी करून गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान करणाऱ्या केंद्रावर शासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे आढळून आल्यास कठोर कारवाई करण्याची मागणी दौंड तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे. आरटीओ पासिंगच्या गाड्या चर्चेत दौंड तालुक्यात त्या वादग्रस्त सोनोग्राफी केंद्रावर बाहेरील जिल्हा आणि परराज्यातील क्रमांकच्या गाड्या या ठराविक वेळेत आणि ठरलेल्या दिवशी अचानक येत आहेत. मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. नक्की दररोज हा बिनबोभाट धंदा चालू आहे. राज्यातून आलेले हे रुग्ण कमिशनची कमाई करणाऱ्या दलालाकडून आल्याची चर्चा आहे. आठवड्यातून किंवा महिन्यातून ठरलेल्या तारखेला हे बेकायदा लाभार्थी गर्दी करतात. याचा दौंड तालुक्यातून शोध घेण्याचे आव्हान आरोग्य आणि पोलीस यंत्रणेवरच आहे. काही अल्पशिक्षितांचा भरती? कमी काळात जास्त पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी अनधिकृत गर्भलिंगनिदान व गर्भपात करीत काही हॉस्पिटल आणि सोनोग्राफी केंद्र करत आहेत मात्र यांच्याकडे अधिकृत सोनोग्राफी करणारी व्यक्ती उपलब्ध नसते किंवा एकाच व्यक्तीच्या नावे दोन सोनोग्राफी केंद्र चालविले जात तर नाहीत ना, त्यांच्याकडे पुरेसा शिक्षित केंद्रचालक आहे का? नाहीतर अधिकृत सोनोग्राफी केंद्र नसताना देखील अल्पशिक्षितांचा सोनोग्राफी साठी भरणा असल्याचे देखील प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत.