पुणे जिल्हा : पशूपालकांना दीड लाखांचे विनातारण कर्ज

मंचर पशुधन विकास अधिकारी डॉ. महाकाळ : शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत मिळणार पैसे
मंचर –शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत पशुसंवर्धन विभागातर्फे पशुपालकांना 1 लाख 60 हजार रुपयांचे कर्ज (प्रत्येक गायीसाठी रक्कम 20 हजार रुपये व प्रत्येक म्हैशीसाठी 22 हजार रुपये) विनातारण उपलब्ध होत आहे. या योजनेचा लाभ पशूपालकांनी घ्यावा, असे आवाहन मंचर पशुधन विकास अधिकारी डॉ. अरुण महाकाळ यांनी केले.
मंचर (ता. आंबेगाव) येथे शेठ अंबालाल चॅरिटेबल ट्रस्ट सभागृहात पुणे जिल्हा परिषद, आंबेगाव तालुका पंचायत समिती, पशुसंवर्धन विभाग व भीमाशंकर सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित यांच्या वतीने पशुसंवर्धन खात्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना व वंध्यत्व निवारण शिबिरात महाकाळ बोलत होते. यावेळी भीमाशंकर दूध संस्थेचे अध्यक्ष साहेबराव निघोट, सचिव शरद भेके, डॉ. विठ्ठल ढोले, डॉ. विठ्ठल वाघ दूध संस्थेचे संचालक व 150 गवळी उपस्थित होते. यावेळी 25 जणांना क्रेडीट कार्ड व गुरांची प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या औषधांचे वाटप करण्यात आले.
डॉ. महाकाळ म्हणाले, शेळी/ मेंढी (10+1) खरेदी. कुक्कुटपालन (100 पक्षी) व मत्स्य व्यवस्थापन सुरू करण्यासाठी बॅंकेतून कर्ज उपलब्ध होते. किसान क्रेडीट कार्ड काढण्यासाठी जवळच्या राष्ट्रीयीकृत बॅंकित भेट देऊन तपशील प्राप्त करावा. किसान क्रेडीट कार्ड घेण्यासाठी बॅंकांची फी रद्द करण्यात आली आहे. किसान क्रेडीट कार्डला पंतप्रधान किसान निधीला जोडले आहे.
पी. एम. किसानच्या वेबसाइटवर जाऊन शेतकरी किसान क्रेडीट कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट आऊट बॅंकेत जमा करावी. ज्या बॅंकेत आपले खाते आहे, तेथे ऑनलाइन अर्ज जमा करून पोच घ्यावी.’ वंध्यत्व कसे येते याबाबत अनिकेत गायकवाड, लक्ष्मण तरटे, मनोज शुल्क वैभव सावंत यांनी मार्गदर्शन केले.





