पुणे जिल्हा : विठ्ठलवाडीत महायुतीचा एकोपा

ज्ञानेश्वर कटके यांना आघाडी
तळेगाव ढमढेरे – शिरूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक चुरशीची झाली. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीचा धर्म पाळत ज्ञानेश्वर कटके यांना आघाडी देण्यात भूमिका बजावली. यात विठ्ठलवाडी गावातून महायुतीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर कटके यांना आघाडी मिळाली.
शिरूर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर कटके तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे माजी आमदार अशोक पवार यांनी निवडणूक लढविली. यामध्ये महायुतीकडून उभे असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर कटके यांचा विजय झाला. अनेक गावपातळीवरील नेत्यांनी आपापल्या गावात जिल्हा परिषद गटातून आपल्या पक्षाच्या नेत्याला आघाडी मिळवी, यासाठी अथक परिश्रम घेतले.
भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव जयेश शिंदे व आमदार अशोक पवार यांचे कट्टर समर्थक उद्योजक राहुल करपे यांनी आपापले गावातील मतदानात आघाडी घेत आपले गड शाबूत ठेवले. जयेश शिंदे यांच्या विठ्ठलवाडीतून महायुतीचा धर्म पाळत महायुतीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर कटके यांना ६४१ मतांची आघाडी दिली.
शिंदे यांनी तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गटात महायुती सरकार सत्तेत असताना अनेक विकासकामे शासन दरबारी प्रयत्न करून मार्गी लावल्याने जिल्हा परिषद गटात शिंदे यांच्या कामाचा फायदा महायुतीला चांगला झाला.
उद्योजक करपेंच्या गावात पवार आघाडीवर
दुसरीकडे माजी आमदार अशोक पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे टाकळी भीमा गावचे उद्योजक राहुल करपे यांनी संपूर्ण तालुक्यात अनेक गावांनी माजी आमदार अशोक पवार यांना पिछाडी मिळत असताना राहुल करपे यांच्या टाकळी भीमात गावात १८६ मतांची आघाडी माजी आमदार पवार यांना दिली. यासाठी करपे यांनी प्रचार यंत्रणा अतिशय सक्षमरित्या चालविली. जिल्हा परिषद गटात माजी आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मोफत शिबिरे, सामाजिक उपक्रम राबविले. त्यामुळे मतदारांनी करपे यांना साथ देत पवारांच्या पारड्यात मतदान केले.





