Pune District : जुन्नर तालुक्यात डोंगरांवर अज्ञातांकडून वणवा

बेल्हे : जुन्नर तालुक्यातील आळे, राजुरी, उंचखडक, बांगरवाडी येथील स्थानिक लोकांच्या मालकीचे डोंगर व वनविभागाचे काही भाग अज्ञात व्यक्तीकडून पेटवून द्यायचा घटना या पाच-दहा दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
बांगरवाडीतील बांधूडा, धावडबांध, दावलमालिक डोंगर, तळ्यांचे कुरण असे सर्व डोंगर काही समाजकंटक एकेक करून दोन-दोन दिवसांच्या फरकाने पेटवून देत आहेत. या गोष्टींकडे गांभीर्याने पाहत नसल्याने व कारवाई होत नसल्याने डोंगर पेटवून देण्याच्या घटना वारंवार वाढत आहेत. त्यात स्थानिक लोकांना व वन्य प्राण्यांना मोठया प्रमाणात झळ पोहचत आहे.
आगीमुळे वन्यजीवांचे अन्नाचे हाल होत आहेत. झाडे, झुडुपे जळून जात आहेत. आगीमुळे प्राण्यांना निवारा राहत नाही. वन्यजीव मानवी वस्तीला आश्रयाला येत आहे. त्याचा फटका स्थानिक शेतकर्यांना होत असून मुक्या प्राण्यांनाही होत आहे. लहान झाडे आगीच्या विळख्यात आल्यामुळे त्यांचीही मोठी हानी निर्माण झाली आहे. यावर ठोस उपाययोजना होणे गरजेचे असून दरवर्षी या समस्या निर्माण होत आहे.
वन विभागाने असे कृत्य कारणांवर कडक कारवाई करावी. तसेच वनविभागातील जाळ पट्टे वेळेत काढले तर आग अधिकच भडकणार नाहीत.
-महेंद्र बांगर, ग्रामस्थ बांगरवाडी





