Pune District : उजनी पाणलोट क्षेत्र बनतंय केळीच आगार

लोणी देवकर : इंदापूर तालुक्यातील उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पळसदेव, चांडगाव, अगोती, वरकुटे बु, कालठण, पडस्थळ, शिरसोडी, माळवाडी आदींसह करमाळा तालुक्यातील कंदर, वाशिंबे, टाकळी, पोमलवाडी, खातगाव, कुगाव, चिकलठाण या एकेकाळच्या पारंपरिक साखरपट्ट्यात ऊस पिकाला फाटा देऊन शेतकरी केळी लागवड करताना दिसत आहेत.
साखरपट्ट्यात केळी पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र वाढल्याने यावर्षी अनेक सहकारी व खासगी साखर कारखान्यांना आपला ऊस गळीत हंगामाचा गाशा उसाअभावी लवकरच गुंडाळावा लागू शकतो. आगामी काळात साखर कारखान्यांना ही धोक्याची घंटा मानली जात आहे. उजनी धरण पाणलोट परिसरातील शेतकरी आता, पारंपारिक ऊस पिकाला बगल देत, निर्यातक्षम दर्जाची केळी लागवड करायला पसंती देत आहेत. ऊस पीक तयार होऊन गाळपास लागणारा लागणारा कालावधी व गाळप होऊन प्रत्यक्ष हातात पैसै येण्यासाठी जास्त दिवस लागतात किंबहुना येतील की नाही याची देखील शाश्वती नसते. तुलनेत केळी पिकाचे पैसे तात्काळ मिळतात तर उसाचे पैसे वेळेवर मिळतीलच याची शाश्वती नाही. असा शेतकर्यांचा अनुभव आहे.
इंदापूर तालुक्यात एका साखर कारखान्याचे गाळप तर तब्बल तेरा लाख मे. टनावरून अडीच तीन लाख मे. टनांपर्यंत खाली आले आहे. करमाळा तालुक्यात अनेक कारखाने बंद असल्याने तालुक्याबाहेरील खासगी वा सहकारी साखर कारखान्याची मनधरणी करून ऊस गाळपासाठी द्यावा लागतो. अशा अनेक अडचणींचा सामना करीत शेतकरी केळी पिकाच्या लागवडीकडे वळाले असल्याचे दिसते. उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्र आता केळीचे ‘आगार’ म्हणून नावारूपाला आले आहे. गेल्या हंगामात केळीला प्रति किलो 33 ते 30 रुपये एवढा उच्चांकी दर मिळाला आहे. त्यामुळे केळी पीक तोट्यात जात नाही हा केळी उत्पादकांना भरोसा आला आहे. सध्या केळीला 20 ते 22 रुपये दर मिळत असला तरी यापुढे निश्चितच केळीच्या दरात सुधारणा होईल अशी शेतकर्यांना अपेक्षा आहे.
उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सर्वप्रथम जी- 9 जातीची केळी लागवड करण्यास पसंती दिली. त्यापासून ते केळी उत्पादकांना चांगला फायदा मिळाला. त्यानंतर उजनी धरणाच्या दोन्ही बाजूला इंदापूर व करमाळा भागात केळी पिकाचे क्षेत्र वाढले. आता हा साखर पट्टा केळीचे आगार झाला आहे. पारंपारिकला ऊस पिकाला फाटा देऊन उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेतकरी केळी पिकाबरोबरच इतर फळपिकाकडे वळत आहे. केळी पिकामध्ये कांदा, हरभरा, कलिंगड, खरबूज, मिरची यासारखे पिके आंतरपिके घेतली जात आहेत. ऊसाप्रमाणेच केळी पिकालाही कोणतीही रोगराई नसली तरी वादळ वारे हे नैसर्गिक संकट मात्र मोठे आहे.
देशात महाराष्ट्राबरोबरच गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यात केळीचे मोठे उत्पादन होते; परंतु या ठिकाणी या पिकासाठी ठराविक हंगाम आहे. महाराष्ट्रात सुद्धा जळगावमध्ये ठराविक हंगामातच केळीची लागवड केली जाते; मात्र उजनीच्या परिसरात केळी पिकासाठी उपलब्ध असलेले कोरडे वातावरण व अनुकूल असलेली नैसर्गिक स्थिती, जमिनीची प्रतवारी यामुळे संपूर्ण वर्षभर केळी लागवड होत आहे.
आखाती देशांतून मागणी
उजनी लाभक्षेत्रातील केळीची प्रत चांगली असल्याने आखाती देशातून चांगली मागणी आहे. त्यामुळे दर ही मागील तीन ते चार वर्षापासून चांगला मिळत आहे. येथील शेतकर्यांनी प्रामुख्याने ग्रॅण्डनैन, वेलची, लाल केळी इत्यादी प्रकारची केळी लागवड केलेली आहे. येथील केळीला आखाती देशात मागणी आहे. तसेच खोडवा केळी पुणे, मुंबई सह उत्तर भारतातील मोठ्या शहरातून मागणी आहे. उजनी धरण पाणलोट क्षेत्र व लाभ क्षेत्रात वर्षभरात सुमारे पंधरा लाख मे. टन केळीचे उत्पादन होते. त्यापैकी चाळीस टक्के केळी स्थानिक बाजारपेठेत व देशातील इतर राज्यामध्ये विक्री होते. उर्वरित साठ टक्के केळीची आखाती देशात निर्यात होते.
अर्थकारण बदलण्याची क्षमता
केळी पिकांच्या संदर्भातील वाहतूक, कृषी निविष्ठा, केळी रोपवाटिका यासह पॅकिंग मटेरियल व्यवसायाला चालना मिळाली असून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. परिसरातील अनेक शेतकर्यांची मुले केळी खरेदी- विक्री व्यवसायात उतरली असून त्यांना नवीन व्यवसाय मिळाला आहे. आणखी पायाभूत सुविधा निर्माण झाल्या तर भविष्यात या पिकांमध्ये मोठी संधी शेतकर्यांसाठी उपलब्ध असून परिसराचे अर्थकारण बदलण्याची क्षमता या पिकामध्ये निश्चित मानली जाते.
शेती व्यवसायामध्ये अलीकडच्या काळामध्ये आलेले आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून पिकांचा अभ्यास करून पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती आमच्या पुढच्या पिढीचा युवा शेतकरी करीत आहे. ऊसापेक्षा कितीतरी पटीने केळीचे पीक फायदेशीर आणि शाश्वत असल्याने अलीकडच्या काळामध्ये आम्ही केळी पिकाकडे वळालो आहे.
-महारुद्र पाटील, प्रगतीशील केळी उत्पादक शेतकरी





