पुणे जिल्हा : सर्पदंशाने दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू ; शिरूर तालुक्यात घटना

निमोणे : शिरुर तालुक्याच्या पूर्व भागातील निमोणे गावात मजुरी करण्यासाठी आलेल्या बिहार येथील कुटुंबातील दोन वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला.
जान्हवी कुमारी, असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. गुरूवार (दि.२९) रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विमलकुमार बहादुर राम (रा. काळेवस्ती रोड, निमोणे ता. शिरुर, मूळ रा. दिघली, बिहार) हे पत्नी व मुलगी जान्हवी कुमारी, असे तिघेजण घरी होते.
त्यांची मुलगी जान्हवी ही घराबाहेर अंगणात मांजरासेाबत खेळत होती. अचानक मुलीचा रडण्याचा आवाज आल्याने विमलकुमार राम आणि त्यांची पत्नी दोघेही घरातून बाहेर आले. सापाने मुलीला डाव्या पायाला दंश करताना त्यांनी बघितले. त्यांनी मुलीली जवळ घेतले. त्यावेळी हा साप जवळच बिळामध्ये जाताना दिसला.
त्यानंतर त्यांनी मालक संभाजी ढगे यांना फोन करुन सांगितले. त्यांचे मालक ढगे यांनी त्यांच्या गाडीत मुलीस उपचारसाठी शिरुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी जान्हवी कुमारी हिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. पुढील तपास पोलीस नाईक विनोद मोरे करीत आहेत.





