पुणे जिल्हा : कोयते बाळगल्याप्रकरणी दोघेजण ताब्यात

उरुळी कांचन – पुणे- सोलापूर महामार्गावर कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एका हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या चारचाकी गाडीतून दोन युवकांना दोन कोयत्यासह उरुळी कांचन ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोयता गँगमधील गुन्हेगारांना शहर पोलिसांनी बेदम चोप दिल्याच्या घटनेनंतर आता कोयता गॅंगचे लोन ग्रामीण भागात पोहोचले आहे. उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील आठ दिवसात ही दुसरी घटना घडली आहे. चंद्रशेखर दाजी चोरमुले (वय २९, रा. माळी मळा, लोणी काळभोर, ता. हवेली) व आकाश मधुकर लांडगे (वय १९, रा. बस स्टॉपच्या पाठीमागे, उरुळी कांचन, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन कोयते व एक चारचाकी गाडी असा ५ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १६) सायंकाळच्या सुमारास पुणे – सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीतील पुणे सोलापूर हायवे रोड लगत हॉटेल चायनीज कट्टा समोर उभ्या असलेल्या एका लाल रंगाच्या गाडीत दोघेजण कोयते बाळगून बसले आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानुसार संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक लाल रंगाची चारचाकी गाडी दिसून आली. गाडीजवळ जाऊन गाडीत बसलेल्या दोघांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी कबुली दिली.
दरम्यान, गाडीची पाहणी केली असता गाडीत एक हजार रुपये किमतीचे दोन कोयते मिळून आले. याप्रकरणी दोघांनाही उरुळी कांचन पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ लोखंडी कोयते व एक चारचाकी गाडी असा ५ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे, सहाय्यक फौजदार नवले, पोलीस हवालदार रणजीत निकम, रमेश भोसले, सचिन जगताप, पोलीस शिपाई दीपक यादव, सुदर्शन माने यांनी केली आहे.





