पुणे जिल्हा : कदमवाकवस्तीत होर्डिंग्ज कोसळून दोघे जखमी ; वाजंत्रीचा घोडा जखमी

लोणी काळभोर – अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे कदमवाकवस्ती (ता. हवेली) हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ गुलमोहर लॉन्स येथे महाकाय होर्डिंग कोसळले. ही घटना शनिवारी (दि.१८) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. दुर्घटनेत दोघेजण जखमी झाले तर एका घोड्याला किरकोळ मार लागला आहे. गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अनधिकृत व धोकादायक होर्डिंग्जचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भरत साबळे (वय ५७, रा. येरवडा, पुणे), अक्षय कोरवी (वय. २७, रा. पुणे), अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गुलमोहर लॉन्स येथे एक सोहळा होता. सोहळ्यासाठी पुण्यातील एका बँड बाजा पथकाला सुपारी दिली होती. हे पथक गुलमोहर लॉन्स येथे आले होते. यावेळी गुलमोहरच्या समोरील अंगणात वाजंत्री बसले होते.
तेथेच एका झाडाखाली घोडा गाडी बांधली होता. ओढ्यालगत धोकादायक होर्डिंग बांधले आहे. दुपारी सव्वा चारच्या सुमारास अवकाळी पाऊस व वादळी वारा सुरु झाला. पावसात हे महाकाय होर्डिंग कोसळले. होर्डिंगखाली भरत व अक्षय हे दोघे सापडले. तेव्हा दोघांना नागरिकांनी तातडीने बाहेर काढले. उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.
दोन्ही जखमींची प्रकृती स्थिर आहे. दुर्घटनेत घोडाही किरकोळ जखमी झाला आहे. ही माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हवालदार रामदास मेमाणे, अंमलदार अजिंक्य जोजारे घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.





