Pune District : तुकाराम बीजेला आळंदीत पाण्याचा ठणठणाट

आळंदी : आळंदीतील अनेक भागांत सहा ते सात दिवसांनंतरही पाणीपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. ऐन तुकाराम बीजेच्यादिवशी शहरातील अनेक भागांत पाणीपुरवठा न झाल्याने बीजेनिमित्त आळंदीत दाखल झालेल्या भाविकांबरोबरच स्थानिक नागरिकांनादेखील याचा फटका बसला. तर एकाच भागात वारंवार पाणीपुरवठा होत असून, आकसापोटी शहराच्या ठराविक भागाला पाणीपुरवठ्यापासूनवंचित ठेवले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.
आळंदी नगरपरिषदेच्या हद्दीतील आळंदी गावठाण, पद्मावती माता मंदिर, वडगाव रस्ता, चाकण चौक, घुंडरे आळी, देहू फाटा या भागांतील पाणीपुरवठा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे केला जातो. पाणी सोडण्याचे नियोजन हे पाणीपुरवठा विभागाकडूून केले जाते. त्याची माहिती समाजमाध्यमांवर कळविली जाते. त्यानुसार सकाळी पावणे सात ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंतचे वेळापत्रक आखण्यात आले आहे. तांत्रिक बिघाड झाल्यास या वेळापत्रकात बदल केला जातो.
आळंदी नगरपरिषदेच्या देहूफाटा परिसरात एकूण लोकसंख्येच्या 30 ते 35 नागरिकांचे वास्तव्य आहे. याठिकाणी दर दोन ते तीन दिवसाने पाणीपुरवठा केला जात आहे. तर घुंडरे आळी व पद्मावती रस्त्याच्या भागात मात्र सहा दिवस होऊनही पाणीपुरवठा केला जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असून, पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजाबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
टँकरमधूनही पाणीपुरवठा नाही
आळंदीच्या हद्दीतील अनेक भागांत पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. पाणीपुरवठा न झाल्याने आलंदीच्या अनेक भागांत धुलीवंदन सण साजरा केला नाही. मात्र, तुकाराम बीजेलादेखील काही भाग आठ दिवस पाण्यापासून वंचित राहिल्याचे वास्तव आहे. तर कोट्यवधी रुपयांचे सुशोभिकरणाचे काम करणार्या नगरपरिषदेकडून वंचित भागात वॉटर टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करायला निधी उपलब्ध नसल्याची शोकांतिका आहे.





