Pune District : एकलहरे येथे रस्त्याच्या बाजूची झाडे काढली

मंचर : एकलहरे (ता.आंबेगाव) येथे पुणे-नाशिक रस्त्याच्या उजव्या बाजूला पुलाच्या बाजूने झाडे झुडपे वाढल्याने ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थ्यामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. तसेच बिबट्याच्या दहशतीमुळे भीतीचे वातावरण तयार होते. रस्त्याच्या कडेला असलेली झाडेझुडपे जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली आहे.
एकलहरे येथे पुणे-नाशिक रस्त्याच्या उजव्या बाजूला पुलाच्या बाजूने मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली होती. या रस्त्याने एकलहरे-शिंदेवाडी परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांना, महिला,जेष्ठ नागरिक यांना पायी प्रवास करताना रस्त्यावरील जाणाऱ्या वाहनांच्या भीतीने जीवमुठीत धरून प्रवास करावा लागत होता.
यामुळे एकलहरे सुलतानपूर ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन येथे वाढलेली झाडेझुडपे जेसीबी उद्योजक शेखर कानडे यांच्या मदतीने काढून टाकली आहे.अशी माहिती एकलहरे गावच्या ग्रामसेविका शामल थोरात आणि माजी उपसरपंच दीपक डोके यांनी दिली.
एकलहरे रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडेझुडपे,ग्रामपंचायत क्लार्क राहुल डोके, माजी उपसरपंच दीपक डोके व उद्योजक शेखर कानडे यांनी स्वतः उभे राहून काढून घेतली आहेत. पुढील काळात रस्त्याच्या डाव्या बाजूची सुद्धा स्वच्छता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लवकरच केली जाणार असल्याची माहिती सरपंच राणी खैरे, उपसरपंच प्रीती डोके यांनी दिली आहे.
कचरा टाकणाऱ्याला दंड…
एकलहरे परिसरात रस्त्याच्या बाजूला व्यावसायिकांनी किंवा अज्ञात गाडी चालकांनी कचरा टाकून घाण करू नये.अन्यथा या ठिकाणी कचरा टाकताना आढळल्यास सदर व्यक्तीकडून दंड वसूल केला जाईल. असा इशारा ग्रामपंचायत सदस्य प्रदीप शिंदे यांनी दिला. परिसरामध्ये कचरा टाकून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणू नये.असे आवाहन एकलहरे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.





