Pune District : वृक्षांचे संगोपन गरजेचे -मुकुंद शहा

वन महोत्सव व डॉक्टर्स डे मोठ्या उत्साहात साजरा
इंदापूर – मानवी जीवनाची जपणूक आणि वृक्षाचे संगोपन, प्रत्येक व्यक्तीने तंतोतंत करावे, जेवढी वृक्षांची लागवड महत्त्वाची, तेवढाच वृक्षांचा सांभाळ देखील गरजेचा आहे हे तत्व पाळण्याची कृती इंदापूरचे शहा ग्लोबल स्कूल करत आहे, असे गौरव उद्गार शहा परिवाराचे प्रमुख मुकुंद शहा यांनी काढले.
इंदापूर शहरातील शहा ग्लोबल स्कूल येथे वन महोत्सव व डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या वतीने मुकुंद शहा बोलत होते. यावेळी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन भरत शहा, इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, वैशाली शहा, डॉ. संजय शहा, डॉ. चिंतामण पाटील, डॉ. यतीन शिंदे, श्रीमती प्रतिमा शहा, डॉ. बिचकुळे त्यांच्यासह पालक विद्यार्थी शिक्षक मोठ्यां संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते स्कूलच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्षाचे महत्व पटवून देणारे फलक घेऊन रॅली काढली. सर्वप्रमुख पाहुण्यांचे स्वागत, संस्थेचे विश्वस्त अंगद शहा व रुचिरा शहा यांनी केले. डॉ. क्षितिजा शहा यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याचे व पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगत, पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असे आवाहन केले. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची झाडे लावली.
आणि आपल्या परिसरातील झाडांची निगा राखण्याची शपथ घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरुकता निर्माण झाली. आणि वृक्षारोपणाचे महत्त्व समजले. विद्यार्थी सोहम होळकुंदे याने, वन महोत्सवाबाबत आपले मनोगत व्यक्त केले. नंदिनी रणदिवे आणी स्वराली शेंडे यांनी वन विषयक कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शिक्षिका रितू शुक्ला यांनी केले व कार्तिकी पाटील यांनी आभार मानले.
स्कूलमध्ये सात दिवस वन महोत्सव
शहा ग्लोबल स्कूल मध्ये 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान शाळेमध्ये वन महोत्सव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या काळात प्रत्येक वर्गाकडून झाडांचे वनांचे आपल्या जीवनातील महत्त्व पटवून देणार्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल. अशी माहिती संस्थेचे विश्वस्त अंगद शहा यांनी दिली





