पुणे जिल्हा : तळेगावात ३०० जनावरांवर उपचार

दूध संघाचे संचालक ॲड. ढमढेरे यांचा उपक्रम
तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे येथे पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक ॲड स्वप्नील ढमढेरे यांच्या वतीने अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पशुवैद्यकीय आरोग्य शिबिरांतर्गत ‘ जनावर जंतू निर्मूलन’ कार्यक्रम पार पडला. यावेळी शिबिरात ३०० जनावरांवर उपचार करण्यात आले.
तळेगाव ढमढेरे येथे आयोजित शिबिरात शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नामुळे अर्थसंकल्पात दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर पाच रुपये अनुदान देण्यात आले आहे. आतापर्यंत २ लाख ९३ हजार दूध उत्पादकांना अनुदान वाटप केले आहे. त्यासाठी २२३ कोटी ८३ लाखांचा निधी वितरित केला असून ही योजना पुढे सुरूच राहणार आहे. योजनेची माहिती शेतकऱ्यांना देत जनजागृती करण्यात आली.
जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक स्वप्नील ढमढेरे यांनी अनुदानासाठी अजित पवार व सरकारचे आभार मानले. अविनाश ढमढेरे यांच्या गोठ्यात पशू वैद्यकीय तपासणीस सुरवात करून पूर्ण गावामध्ये दूध व्यावसायिक शेतकऱ्यांकडे जाऊन उपक्रम राबविला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष यशवंत ढमढेरे, प्रगतशील शेतकरी बाळासाहेब लक्ष्मण ढमढेरे, संदीप ढमढेरे उपस्थित होते.
शिबिरात डॉ. संतोष वीर, डॉ. महेश जाधव, डॉ. संतोष ढोबळे, डॉ.शरद दिवेकर, डॉ. दिनेश नागवडे, डॉ. प्रसार ठोंबरे, डॉ. सौरभ वाबळे यांनी जनावरांवर उपचार केले. कार्यक्रमासाठी कंपनीचे नॅशनल सेल्स मॅनेजर किशोर बोपचे, प्रतिनिधी हरिदास सांगळे, एमडी बायो सोल्युशन कंपनीच्या संचालिका मधुमती कुलकर्णी व दीपाली सोनवणे यांनी सहकार्य केले.





