पुणे जिल्हा : घरगुती साहित्याच्या आड गुटख्याची वाहतूक

65 लाख 19 हजर 800 रुपयांचा माल जप्त ; खेड शिवापूर महामार्गावर कारवाई
खेड शिवापूर – महामार्ग पोलिसांनी खेड शिवापूर टोल नाक्यावर मोठी कारवाई केली असून, या करवाईमध्ये 65 लाख 19 हजार 800 रुपये किमतीचा गुटखा पान मसाला पकडला. पुणे-सातारा महामार्गारील खेड शिवापूर टोल नाक्यावर घरगुती साहित्याच्या नावाखाली पान मसाला (गुटखा) वाहतूक करणाऱ्या वाहनावर महामार्ग पोलिसांनी कारवाई करत गुटखा जप्त केला असून इमरान अहमद अजमल खान (रा. वसई, ठाणे), सुजित अगरवाल (रा. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (दि. 11) सकाळी नऊच्या सुमारास खेड शिवापूरच्या हद्दीतून सातारा-पुणे महामार्गावरून घरगुती साहित्याच्या नावाखाली पान मसाला घेऊन जाणाऱ्या वाहनाची माहिती महामार्ग पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार महामार्ग पोलिसांनी टोल नाक्यावर सापळा रचून वाहन पकडले.
वाहनचालक इम्रान अहमद अजमल खान (वय 41, उत्तर प्रदेश सध्या रा. वसई) याला पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून टाटा टेम्पो (एमएच 03 सीव्ही 3017) सह 65 लाख 19 हजार 800 रुपये किमतीचा पान मसाला (गुटखा) जप्त करण्यात आला आहे. हा गुटखा कर्नाटकमधून आणला जात असून, पुणे येथील सुजित अग्रवाल या व्यापाऱ्याला देण्यासाठी आणला असल्याचा चालकाने सांगितले.
इमरान अहमद अजमल खान (रा. कोळीवाडा रस्ता, वसई, वसई, ठाणे) आणि सुजित अग्रवाल (रा. पुणे) या दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





