Pune District : मुळशी तालुक्यातील शिक्षकांना चार टप्प्यात प्रशिक्षण

पिरंगुट : राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 हे प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना दिले जात आहे. मुळशी तालुक्यातील शिक्षकांना चार टप्प्यात हे प्रशिक्षण दिले जाणार असून बावधन येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये पहिला टप्पा सुरू आहे.
पाच दिवसांच्या या प्रशिक्षणात शिक्षक विद्यार्थ्यांच्या भूमिकेत असून ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, बदल अभ्यासत आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे जिल्हा परिषद आणि मुळशी पंचायत समितीच्या वतीने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील सुमारे एक हजार शिक्षकांना चार टप्प्यात हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 228 शिक्षक सहभागी झाले आहेत. बावधनच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये या प्रशिक्षणाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी सुजाता देशमाने, विस्तार अधिकारी अशोक गोडसे यांच्या हस्ते झाले. या प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून मुठा केंद्रप्रमुख सोपान ठकोरे, भूगाव केंद्रप्रमुख चंद्रकांत म्हाळसकर, विषयतज्ञ संतोष गायकवाड व मीनाक्षी खाडे हे काम पाहत आहेत.
प्रियतमा फापाळे, सुवर्णा सातपुते, बापूसाहेब पवार, सुनीता पवार, प्राची दंडवते, पल्लवी चौधरी, विनोद खंडागळे, अक्षता उत्तेकर, सविता थोरात, मनीषा लेकुरवाळे, रत्नदीप रामटेके, संजय बोरसे, महेश सलगंटे, राम करपे, शुभांगी मोरे, रेवणनाथ आढाव हे सोळा तज्ञ मार्गदर्शक शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षण धोरण आराखडा समजावून सांगतात. पाच कुलांमध्ये प्रत्येकी 50 शिक्षकांना हे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणामध्ये नवीन शिक्षण धोरणामध्ये जे बदल आहेत, ज्या नवीन संकल्पना आहेत.
तसेच ज्या क्षमता अधिक प्रभावी करण्यात आलेल्या आहेत. त्याची माहिती दिली जाते आहे. राज्य अभ्यासक्रम आराखडा – शालेय शिक्षण, पायाभूत स्तर, समग्र प्रगतिपत्रक, क्षमता आधारित मूल्यांकन, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, मूल्यांकनाची कार्यनीती, प्रश्ननिर्मितीचे प्रकार, क्षमता आधारित प्रश्ननिर्मिती कौशल्ये, उच्चस्तरीय विचारप्रवर्तक प्रश्न, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा या विषयांच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात येत आहे. प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांच्या विचारशक्तीला वाव मिळावा, यासाठी त्यांच्याकडून विविध विषयांबाबत गटकार्य करवून घेतले जाते.
ऑनलाइन लिंकच्या माध्यमातून शिक्षकांचे याबाबतचे ज्ञानही आजमावण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकंदर हसत खेळत कृतीकार्याच्या माध्यमातून शिक्षकांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील आराखड्याबाबत जागृत करण्याचे काम प्रशिक्षणाच्या माध्यमातून सुरू आहे. डाएटचे प्राचार्य एन. पी. शेंडकर यांनीही प्रशिक्षणास भेट देऊन शिक्षकांना मार्गदर्शन केले.
शिक्षकांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये, राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील शालेय शिक्षण आणि पायाभूत स्तर समजून घ्यावा. विद्यार्थ्यांचे क्षमता आधारित मूल्यांकन आणि शाळास्तर मूल्यांकन करावे. विद्यार्थी मूल्यांकनामध्ये समग्र प्रगतीपत्रकाचा, अध्यापनामध्ये अनुभवजन्य व खेळ आधारित पद्धतीचा वापर करावा. 21व्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवावे. या उद्देशाने घेतलेले प्रशिक्षण आमच्यासाठी नक्कीच फलदायी ठरेल.
-विवेक देशमुख/परशुराम वाघचौरे, प्रशिक्षणार्थी शिक्षक





