Pune District : आळंदीत वाहतूक कोंडी; लग्नाची तारीख, एकादशीमुळे गर्दी : वाहतूक पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न

आळंदी : अपरा एकादशीनिमित्त भाविक आणि लग्नांमुळे वऱ्हाडी मंडळी मोठ्या संख्येने आळंदीत आल्याने शहरात दुपारी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. काही बेशिस्त वाहनचालकांनी दोन लेन केल्याने आणि वऱ्हाडींची वाहने काही ठिकाणी रस्त्यात पार्क केल्याने वाहतूक सुरळीत करण्यात अडचणी येत होत्या. वडगाव रस्त्यावर तब्बल दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शर्थीचे प्रयत्न करीत पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. मात्र, एक तासाहून अधिक काळ वाहतूक कोंडीत अडकल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
महाराष्ट्रातील मोठे तीर्थक्षेत्र, मंगल कार्यालये, रहिवाशांची वाढती लोकसंख्या विचारात घेता आळंदी शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत चालली आहे. यावर उपाययोजना आवश्यक आहेत. आळंदीसाठी स्वतंत्र वाहतूक विकास आराखडा तयार करून प्रभावी अंमलबजावणीची मागणी होत आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय बैठकांमध्ये वाहतूक कोंडीचा विषय प्राधान्याने घेऊन त्यावर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
आळंदीहून पुणेकडे जाताना देहू फाटा येथे दोन विद्युत पोल रस्त्यातच उभे आहेत. या पोलमुळे वाहतूकीला मोठा अडथळा होत असून अनेकदा अपघाताच्याही घटना घडल्या आहेत. सदर पोल हटवून पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली जात आहे. एखादा मोठा अपघात घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्नही नागरिक करत आहेत.
अपरा एकादशीनिमित्त भक्तीमय वातावरण
अपरा एकादशीनिमित्त आज सकाळपासून भाविकांची आळंदीत गर्दी वाढली होती. हजारो भाविकांनी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले. तसेच गळ्यात टाळ, मृदंग विणा, खांद्यावर पताका घेऊन भाविक वारकऱ्यांनी ढगाळ वातावरणात पावसांच्या हलक्या सरी अंगावर झेलत नगर प्रदक्षिणा केली. माऊली मंदिर गाभाऱ्यात आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच आळंदीत विविध धर्मशाळा, मंदिरांमध्ये कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. एकादशीनिमित्त सर्वत्र भक्तीमय वातावरण होते.





