पुणे जिल्हा : जेजुरी -बेल्हा मार्गावर होर्डिंग्जचे मनोरे

वर्दळीच्या मार्गावर प्रवाशांच्या जीवाला घोर
तळेगाव ढमढेरे – तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील जेजुरी -बेल्हा व शिक्रापूर -न्हावरा महामार्गावर होर्डिंग्जनी धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस दिवस होर्डिंग्जचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. होर्डिंग्ज उभे करण्यासाठी संबंधित प्रशासनाची परवानगी घेतली आहे का, याकडे ग्रामप्रशासनाने लक्ष द्यायला हवे. विनापरवाना होर्डिंग उभे कारणाऱ्यावर कार्यवाही होणार का, असा सवाल उमटत आहे.
तळेगाव ढमढेरे परिसरात उंच उंच व बलाढ्य स्वरूपाचे होर्डिंग्ज उभारले आहे.वादळी वाऱ्याने हे होर्डिंग्ज पडले तर रोडवर पडतील. यात प्रवाशांना दुखापत होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. संबंधित प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.
जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार शिरूर गटविकास अधिकाऱ्यानीही ग्रामपंचायतीना आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे.
होर्डिंग्ज उभारताना स्ट्रक्चरल इंजीनिअर प्रमाणित दाखला तसेच सक्षम अधिकारी यांची परवानगी व स्ट्रक्चरल ऑडीटबाबतची कागदपत्रे ग्रामपंचायतीमार्फत १५ दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा होर्डिंग्ज अनधिकृत आहे असे गृहीत धरून पुढील कार्यवाही केली जाईल, असे पत्र गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतीना पाठविले असल्याचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी सांगितले आहे.
तळेगाव ढमढेरे परिसरातील सर्व होर्डिंग्जधारकांना होर्डिंग उभे करण्यासाठी घेतलेली परवानगी तसेच स्ट्रक्चरल इंजिनियर यांनी प्रमाणित केलेला दाखला, अन्य पूर्तता केलेल्या कागदपत्रांची प्रत ग्रामपंचायतीत जमा करावी. याबाबत नोटीस दिल्या आहेत. शासनाच्या निर्देशानुसार पोलीस बंदोबस्तात अनधिकृत होर्डिंग हटविण्याची कार्यवाही केली जाईल.
– राजेंद्र सात्रस, ग्रामविकास अधिकारी, तळेगाव ढमढेरे.





