सासवड : शहरातील जिजामाता फळे-भाजीपाला बाजारामधील पथविक्रेत्यांकडून अचानकपणे दुप्पट जागा भाडे दैनिक कर वसूल करण्यात आल्याने पथविक्रेत्यांत नाराजी आहे. कोणतीही पूर्वसूचना, जाहीर नोटीस किंवा वर्तमानपत्रात जाहिरात न देता अंकुर अॅडव्हर्टायझिंग या कंपनीने दोन दिवस 50 रुपयांऐवजी 100 रुपये प्रतिदिन कर वसुली केल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सासवड नगरपालिकेत मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांची भेट घेऊन या मनमानी वसुली विरोधात जिजामाता फळे-भाजीपाला बाजारातील निवेदन दिले. आम्ही पथविक्रेते मुख्याधिकार्यांना भेटल्यावर त्यांनी जास्तीतचे 50 रुपये न देण्याबाबत सांगितले. तरीही आज ठेकेदाराच्या माणसाकडून पथविक्रेत्यांकडे 100 रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र त्याला पथविक्रेत्यांनी, आम्ही मुख्याधिकार्यांना भेटलो असून त्यांनी सांगितल्याप्रमाणेच जागा भाडे देणार असल्याचे सांगितल्याचे हरुण बागवान म्हणाले. यावेळी जिजामाता फळ व भाजीपाला विक्रेते संघटनेचे अध्यक्ष माजी नगरसेवक हरून बागवान, उपाध्यक्ष सुनीता होले, सचिव गणेश बुद्धिवंत यांच्यासह राजेंद्र होले, रेखा बुद्धिवंत, विमल लवांडे, विकास बुद्धिवंत, सुवर्णा होले, मनोज होले, मालन पवार, साहिल बागवान, उबेद बागवान, सविता जाधव, पुष्पा मनोज होले, कल्पना जालिंदर काळे, उमेश राऊत, कलाबाई पवार, गुंडाराव कल्लशेट्टी, लीलाबाई धोत्रे आदी पथविक्रेते उपस्थित होते. कोणतीही करवाढ वसुलीसाठी तोंडी किंवा लेखी निर्देश दिलेले नसल्याचे स्पष्ट करीत संबंधित अभिकर्त्यांना म्हणजेच अंकुर अॅडव्हर्टायझिंग कंपनीला लेखी समज देण्यात येईल. – डॉ. कैलास चव्हाण, मुख्याधिकारी, सासवड नगरपरिषद