पुणे जिल्हा : दुचाकीच्या अपघातात तिघे गंभीर जखमी

दामुशेठ घोडे यांच्या तत्परतेने जखमींना उपचार
शिरूर – कवठे येमाई (ता. शिरूर) येथे अष्टविनायक महामार्गावर दोन दुचाकींची जोरदार धडक झाली. अपघातात दोन युवक आणि एक महिला गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (दि.२५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
टाकळी हाजीचे माजी सरपंच दामुशेठ घोडे यांनी सर्व जखमींना उपचारासाठी स्वतःच्या वाहनाने पारगाव (ता. आंबेगाव) येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
यातील दोन युवक कवठे येमाई परिसरातील तर महिला पारगाव येथील असल्याची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते विलास रोहिले यांनी दिली. मात्र त्यांची नावे समजू शकली नाहीत. अपघाताची माहिती समजताच टाकळी हाजीचे माजी सरपंच दामुशेठ घोडे यांनी घटनस्थळाकडे धाव घेतली.
कोणताही विचार न करता माणुसकी दाखवत स्वतःच्या खासगी वाहनाने त्यांनी सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. घोडे यांनी दाखविलेल्या तत्परतेने जखमींना तात्काळ उपचार सुरू झाले. याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त केले.





