पुणे जिल्हा : शाळेतील तीन विद्यार्थांना भरघाव गाडीने उडवले, एकाची प्रकृती चिंताजनक

पौड : शेरे (ता.मुळशी) येथे चारचाकी गाडीने बेदरकारपणे रस्त्याच्याकडेने चालणाऱ्या तीन शाळकरी मुलांना उडवले. कारचालक गाडीसह पळून गेला. यातील तिघेही जखमी झाले असून एकाला गंभीर दुखापत झाली.
प्रेम साहेबराव चव्हाण (वय 13, इयत्ता 7 वी), कार्तिक रामेश्वर मावकर (वय 14, इयत्ता 8 वी) आणि सम्यक प्रमोद चव्हाण (वय 14, इयत्ता 8 वी, सर्व रा.अकोले ता. मुळशी) अशी जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. प्रेम, कार्तिक, सम्यक हे तिघेही शेरे येथील मामासाहेब मोहोळ विद्यालयात शिकतात. शुक्रवारी (5 सप्टेंबर) सायंकाळी शाळा सुटल्यानंतर तिघेही रस्त्याच्या कडेने घराकडे चालले होते.
त्याचवेळी पाठीमागून पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार येत होती. स्वामी समर्थ हॉटेलजवळ दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात वेगात असलेल्या कारचालकाने तिघांनाही उडविले. जोरदार धडकेने तिघेही उडून रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. जखमी आणि रक्तबंबाळ झालेल्या विद्यार्थ्यांना उडवून कारचालकाने कारसह तिथून पळ काढला.
स्थानिकांच्या मदतीने तिघांनाही खासगी रिक्षाने पौड ग्रामीण रूग्णालयात आणले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना लवळे येथील सिम्बॉयोसिस रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर प्रेम याच्या डोक्यावर केईएम रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली.
सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे धडक देणाऱ्या कारचा पोलिसांनी शोध घेतला. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच शेरे विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंद पिंगळे आणि शिक्षकांनी सिम्बॉयोसिस रूग्णालयात धाव घेतली. तिन्ही मुलांच्या कुटुंबीय, नातेवाईकांसह शेरे आणि अकोले गावातील ग्रामस्थही रूग्णालयात रात्री उशीरापर्यंत थांबले होते.





