पुणे जिल्हा : महादेव बेटिंग ॲप प्रकरणातील तीन मुख्य आरोपींना मध्य प्रदेशातून अटक

पुणे – स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व नारायणगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मध्यप्रदेशातील शाहगड (जिल्हा सागर) येथून नारायणगावातील अनधिकृतपणे चालणाऱ्या महादेव बेटिंग ॲप प्रकरणातील तीन मुख्य फरार आरोपींना ताब्यात घेतले आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.
राज ललित बोकारिया (२९, शांती नगर, जुन्नर), ऋत्विक सुरेश कोठारी (२४, वारूळवाडी), मोहमद सलमान पठाण (३२, नारायणगाव) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आत्तापर्यंत एकूण 93 आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी 5 आरोपींना पुढील तपास कामी पोलीस कोठडी देण्यात आली होती. यामधील मुख्य तीन आरोपी फरार होते. त्यांना पकडण्यात यश आले आहे.
येरवडा येथे रवानगी करण्यात आलेल्या 88 आरोपींपैकी 13 आरोपींना तपास कामी पुन्हा ताब्यात घेणार असल्याचेही यावेळी शिळीमकर यांनी सांगितले.
सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार,
पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, पोलिस हवालदार दीपक साबळे, विक्रम तापकीर, पोलीस नाईक संदीप वारे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले, सत्यम केळकर यांच्या पथकाने केली आहे.





