– श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथे जनावरांच्या गोठ्यात जाताना बिबटे सीसीटीव्हीत कैद मंचर – श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथील शेटे मळ्यातील माजी सरपंच सुखदेव नाना शेटे यांच्या घरासमोरील ओट्यावरून जनावरांच्या गोठ्यात जाताना तीन बिबटे सीसीटीव्हीत बुधवार, दि.२३ रोजी कैद झाले. एकाच वेळी तीन बिबटे घरासमोर आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबटे गोठ्यामध्ये असणाऱ्या वासराची शिकार करण्यासाठी जात असतानाच गोठ्यातच झोपलेल्या शेतकऱ्याला जाग आल्यामुळे व त्याने आरडाओरडा करत बिबट्याला हुसकल्यामुळे वासरू बचावले आहे. बुधवारी पहाटे सव्वा एक वाजण्याच्या सुमारास ३ बिबटे सुखदेव नाना शेटे यांच्या घरासमोरील ओट्यावरून जनावरांच्या गोठ्यात जाताना सीसीटीव्ही कैद झाले आहे. या ठिकाणी घराला लागूनच गोठा असल्याने गोठ्यामध्ये अनेक जणावरे होती. बिबट्या दबक्या पावलाने येऊन गोठ्यामधील वासराला आपले भक्ष बनवत असतानाच त्याची हालचाल व त्या ठिकाणी असणाऱ्या इतर जनावरांची हालचाल होऊन आवाज झाल्याने शेजारी झोपलेल्या शेतकऱ्याला जाग आली व त्याने जोर जोरात आरडाओरडा करत जवळ असणाऱ्या काठीच्या इशाऱ्याने बिबट्याला हुसकावून लावले आहे. त्यामुळे वासराचा व त्याठिकाणी असणाऱ्या जानावरांचा व स्वःताचा जीव शेतकऱ्याला वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान एकाच वेळी तीन बीबटे या परिसरात आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण असून वनविभागाने या ठिकाणी तात्काळ पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करावे,अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. वडगाव काशिंबेग परिसरात ओढे, नाले,उसाच्या क्षेत्रा बरोबरच आता बिबट्या नागरी वस्तीतही मोठ्या प्रमाणात दिसू लागला आहे.तातडीने वनखात्याने उपयोजना करावी,अशी ग्रामस्थांची मागणी आहे. – बाळासाहेब पिंगळे, माजी सरपंच, वडगाव काशिंबेग.