Pune District : त्या लाभार्थ्यांना शेती महामंडळाची जागा मिळवून देणार

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील ज्या लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा नसेल त्या लाभार्थ्यांना शेती महामंडळाची जागा कशी मिळेल, यासाठी शासनाकडे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राज्याचे क्रीडा व अल्पसंख्यांक विकासमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांच्या प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण टप्पा -2 च्या 20 लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र वाटप व घरकुलाच्या 10 लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरणाच्या, गृहोत्सवाचा कार्यक्रम आज देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमास व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे इंदापूर पंचायत समितीच्या सभागृहात सहभागी झाले. यावेळी इंदापूर तालुक्यातील लाभार्थ्यांना पत्राचे वाटप करण्यात आले.
इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, हनुमंत कोकाटे, सचिन सपकळ, यांच्यासह तालुक्यातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. भरणे म्हणाले, तालुक्यातील गरीब कुटुंबांना गरीब माणसाला हक्काचे घर कसे देता येईल. यासाठी निश्चित प्रयत्न केला जाईल. गरीब माणसाला मदत केली तर तो माणूस कधीही विसरत नाही. म्हणून महिला भगिनींना आधार देण्याची भूमिका, बचत गटाच्या माध्यमातून राज्य सरकारने घेतली आहे. मिळालेल्या कर्ज प्रकरणातून नवनवीन व्यवसाय इंदापूर तालुक्यातील महिला भगिनी सुरू करतील आणि त्या स्वतःच्या पायावर उभा राहतील.
सचिन खुडे म्हणाले, आजचा दिवस इंदापूर पंचायत समितीसाठी नाही तर महाराष्ट्र राज्यासाठी आनंदाचा दिवस आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते टप्पा दोनच्या 20 लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करणे आणि यापैकी दहा लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण करणे, असा महत्वकांक्षी कार्यक्रम राज्यात पहिल्यांदा होत आहे.
राज्य शासन केंद्र शासनाच्या योजना सत्त्यात उतरताना आपणास दिसत आहेत. इंदापूर तालुक्यातील 61 बचत गटांना दोन कोटी 22 लाखाची कर्जवाटप होत आहे. राष्ट्रीयकृत बँकाच्या माध्यमातून हे कर्ज वाटप होत आहे. त्यामुळे सर्व बँकांचे पंचायत समितीच्या माध्यमातून मनस्वी आणि अभिनंदन करतो. कर्ज घेणे ही किचकट प्रक्रिया असताना देखील, बचत गटांना सक्षम करण्यासाठी कर्जाची उपलब्धता होत आहे.
-सचिन खुडे, गट विकास अधिकारी इंदापूर





