Pune District : यंदा वारीसाठी दुप्पट वारकरी येणार

नीरा : यावर्षी आम्ही गेल्या वर्षी पेक्षा दुप्पट भाविक या वारी सोहळ्यामध्ये सहभागी होतील असा अंदाज धरून नियोजन केले आहे. आज आम्ही वारी मार्गावरील आणि पालखी विसावा स्थळांवर असलेल्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. काही अडीअडचणी आहेत त्या दूर करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिलेलेल्या आहेत. काही विषय असे आहेत की, ते लगेच दुरुस्त केले जातील.तर काही विषय असे आहेत की, जे लाँग टर्म आहेत त्याच्या संदर्भात नियोजन करून ते मार्गी लावले जातील, असे आश्वासन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पुणे जिल्ह्यातील पालखीतळांची आणि पालखी महामार्गाची पाहणी करून मंगळवारी (दि. 27) दुपारी जिल्हाधिकारी पुणे जिल्ह्यातील शेवटचे विसावा स्थळ असलेल्या नीरा नदीकाठच्या विसावा स्थळावर पाहणीसाठी आले होते. यानंतर त्यांनी वारी सोहळ्याच्या तयारी याची माहिती माध्यमांना दिली. याप्रसंगी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल आणि वारी सोहळा प्रमुख भावार्थ देखणे आदींसह विश्वस्त उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले की, पालखी महामार्गावर सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. विशेषतः दिवेघाटामध्ये रुंदी कारणाचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी पावसामुळे काही ठिकाणी रस्ता वाहून गेलेला आहे. त्या रस्त्याचे काम 10 जून पर्यंत पूर्ण करण्यास सांगण्यात आलेला आहे. सध्या पाऊस आहे पाऊस उघडल्यानंतर रस्त्यावर हॉट मिक्स डांबर टाकला जाईल. तो रस्ता वारकर्यांसाठी तयार केला जाईल. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य सेवा, स्वच्छतागृह यांची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक व्यवस्था देखील चांगली करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. गेल्या वेळेस पालखीला उशीर झाला होता.
तो उशीर यावर्षी होणार नाही. याची खबरदारी घेण्यात आली आहे. यावर्षी पालखी सोहळ्या बरोबर चालणार्या गाड्या या लवकरच पुढे पाठवल्या जातील दोन टप्प्यांमध्ये ही वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे. रथा बरोबर वाहने सोडली जाणार नाहीत. त्यामुळे रथ वेळेवर पोहोचेल. दरवर्षीच्या अनुभवातून आपल्याला परफेक्ट नियोजन करता येणार आहे. त्यामुळे पुढील काळात कोणत्याही वारकर्याला त्रास होणार नाही, इतके नियोजन यावर्षी केला जाणार आहे.
यावर्षी पालखी सोहळ्यामध्ये सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून 3000 पोलीस कर्मचारी यामध्ये अधिकारी, अंमलदार, पोलीस जवान तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर राखीव पोलीस दल होमगार्ड बंदोबस्तासाठी असणार आहेत. कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडू नये म्हणून विशेष टीम देखील ठेवण्यात येणार आहे. फिरते पोलीस स्टेशन देखील या सोहळ्यामध्ये असणार आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोलीस पोलीस मदत केंद्र असणार आहे. महिला अधिकारी आणि अंमलदार देखील यामध्ये असणार आहेत. जवळपास 500 महिला पोलीस कर्मचारी बंदोबस्तला असणार आहेत.
– संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक
यावर्षी पाऊस लवकर आला आहे. त्यामुळे लोकांच्या पेरण्या लवकर उरणार आहेत. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्माचे हे 750 व वर्ष आहे. त्यामुळे पर्व काळ पाहता या सोहळ्यामध्ये वारकर्यांची संख्या दीड पटीने वाढण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर पुण्यातून बाहेर पडताना रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस असणार आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यात हा पालखी सोहळा येत असताना मोठी गर्दी होणार आहे.
– डॉ . भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख





