पुणे जिल्हा : नसरापुरात वाईन शॉप फोडून ४ लाखांची चोरी

कापूरहोळ : पुणे-सातारा महामार्गावरील नसरापूर (ता.भोर) येथे मधुशाला बिअर अॅन्ड वाईन शॉप दुकानाचे शटर चोरटयांनी तोडून ४ लाख १० हजार रोकडसह सीसीटीव्ही डिव्हीआर चोरट्यांनी चोरुन पसार झाले आहे. या बाबत बिअर शॉपीचे मालक उदय नंदकुमार आल्हाटे (वय ३२) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शुक्रवारी दि .27 रात्री बिअर शॉपीचे मालक आल्हाटे यांनी नेहमीप्रमाणे बिअर शॉपीला कुलूप लावून गेले होते. दुसऱ्या दिवशी ते सकाळी आठच्या सुमारास जीमला जात असताना बिअर शॉपीचे शटर एकाबाजूने उचकटलेले दिसले. त्यामुळे त्यांनी दुकानात पाहिले असता, शॉपीमधील माल आहे त्या ठिकाणी होता. परंतु, काऊंटरमध्ये व्यापाऱ्यांना देण्यासाठी ठेवलेली रोख रक्कम ४ लाख त्यांना दिसले नाही.
त्यामुळे त्यांनी दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासणीसाठी कॅमेऱ्याचा डिव्हीआरकडे गेले असता, तो गायब झाल्याचे लक्षात आले. त्यांची खात्री पटली की आपल्या दुकानात रात्रीच्या वेळी चोरी झाली आहे. त्यानुसार त्यांनी ११२ नंबरवर पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. याबाबत राजगड पोलिसांना माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ढावरे हे करीत आहेत.





