पुणे जिल्हा : विधिमंडळात जाताच खेडच्या पूर्व भागाचा पाणीप्रश्न मिटवणार

महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांची ग्वाही
वाफगाव – विधिमंडळात जाऊन पहिले काम पूर्व भागातील पाण्यासाठी करणार, अशी ग्वाही महाविकास आघाडीचे उमेदवार (ठाकरे गट) बाबाजी काळे यांनी केले.
बाबाजी काळे यांचा खेड तालुक्यातील पूर्व भागात गावभेट दौरा पार पडला, या दौर्यात पूर्व भागातील मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गुळाणी येथून या गावभेट दौर्याला सुरुवात झाली. गुळाणी येथील ग्रामस्थांनी फुलांची उधळण करत वाजत गाजत काळे यांचे स्वागत केले. यावेळी सटवाजी महाराजांचे दर्शन घेऊन बाबाजी काळे यांनी प्रचारार्थ घोंगडी बैठक घेतली. या बैठकीत उपस्थित ग्रामस्थंनी पाणी प्रश्नावर लक्ष वेधले. यावर बाबाजी काळे म्हणाले की, या भागातील पाणी प्रश्नासाठी मी कटिबद्ध आहे.
यापूर्वी 15 वर्षे लोकप्रतिनिधीत्व केलेल्या नेतृत्वाने पूर्व भागाला पाण्यासाठी वणवण करायला भाग पाडले आहे. परंतु हा प्रश्न शासन दरबारी मांडून तो सोडविण्याचा मी निर्धार केला आहे. सटवाजी महाराजांच्या आशिर्वादाने हा प्रश्न नक्की मार्गी लागेल अशी मला अपेक्षा आहे. दरम्यान वाफगाव येथे छोटेखानी सभा पार पडली यावेळी राजू जवळेकर यांनी आमदार दिलीप मोहिते यांच्यावर निशाणा साधला.
तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे यांनी सर्वपक्षीय कार्यकर्ते देखील बाबाजी काळे यांच्यासाठी सरसावले असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी हिरामण सातकर, अशोक खांडेभराड, अमोल पवार, अमोल दौंडकर, वंदना सातपुते, माऊली ढेरंगे, सुदाम कराळे, संतोष गार्डी, संतोष गोरडे, वैभव गावडे, रावसाहेब दौंडकर, विलास मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.





