पुणे जिल्हा : भोरला जाणारी जलवाहिनी फुटली

बुवासाहेबवाडीजवळचा परिसर जलमय : शेतीचेही नुकसान
भोर – भाटघर जलाशयातून भोर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी भोर- पुणे मार्गावरील बुवासाहेबवाडी येथे रस्त्याचे काम करीत असताना जेसीबीच्या धक्क्याने फुटली. जलवाहिनीतून वाहणारे हजारो लिटर पाण्याने परिसर जलमय होवून शेतीचेही नुकसान झाले.
भाटघर जलाशयातून परिसरातील आठ गावांना आणि भोर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. भाटघर धरणापासून भोर शहराकडे ३ किलोमीटर अंतरावर जलवाहिनीने पाणी वितरीत केले जाते. ९० एचपी मोटरच्या साह्याने आठ इंच पाइपलाइनद्वारे भोर शहराला पाणीपुरवठा होतो. गुरुवार (दि.१३) कापूरव्होळ-भोर मार्गावरील बुवासाहेबवाडी येथील पुलाजवळ रस्त्याचे काम करीत असताना जेसीबी चालकाकडून जलवाहिनी फुटली गेली.
जलवाहिलीतून जवळजवळ एक तास पाणी कारंज्यासारखे बाहेर फेकले जात होते. वाया गेलेले पाणी शेतकऱ्याच्या भात तरवा टाकलेल्या शेतात तुंबल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. काही वेळाने नगरपालिका प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तुटलेली जलवहिनी दुरुस्त करण्याचे काम सुरू केले.
मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी बुवासाहेबवाडीजवळ रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला रस्त्याच्या बाजूने जलवाहिनी गेल्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी बेजबाबदारपणे काम केल्याने भोर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली गेली. तात्काळ नगरपरिषदेने फुटलेल्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू केले आहे, असे नगरपरिषद मुख्याधिकारी श्रीराम पवार यांनी सांगितले.





