पुणे जिल्हा : लक्ष्मीआईच्या जयघोषाने वाल्हे दुमदुमले

भटक्या डोंबारी समाजाकडून मिरणूक : दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
वाल्हे – डिजेच्या तालावर फटाक्यांच्या आतषबाजी व गुलालाची मुक्त उधळणीत संबळ ताशांचे वाद्यकाम, महिलांनी डोक्यावर घेतलेले कलश, लक्ष्मीआईच्या जयघोषाने वाल्हे (ता. पुरंदर) येथे भटक्या समाजातील डोंबारी समाजबांधवांच्या वतीने लक्ष्मीआई मूर्तीची भव्य मिरवणूक गुरुवारी (दि. 28) काढण्यात आली होती. दिवसभर धार्मिक विधीसह मूर्ती प्रतिष्ठापना, कलशारोहण कार्यक्रम पार पडला.
वाल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारी रेल्वेच्या मोकळ्या जागेमध्ये वर्षोनुवर्षे भटक्या समाजातील डोंबारी कुंटुंब पालांमध्ये वास्तव्यास होते. मागील दोन वर्षांपूर्वी रेल्वेप्रशानाच्या लोहमार्गाच्या विस्तारीकरणामध्ये यांच्या झोपड्या काढण्यात आल्या होत्या.यावेळी मिळेल त्या ठिकाणी डोंबारी समाज बांधव झोपड्याटाकुन राहू लागले.
यातील बहुतांश कुटुंबीयांनी वाल्हे ग्रामपंचायत हद्दीतील चाहुरवस्ती येथे काळुबाई डोंगराच्या पायथ्यालगत जागा घेऊन वास्तव्यास सुरुवात केली. दरम्यान, या समाजबांधवांचे ग्रामदैवत लक्ष्मीआईचे मंदिर लोहमार्गाच्या विस्तारीकरणामध्ये गेले असल्याने त्यांनी चाहुरवस्ती येथे स्वखर्चातुन छोटे मंदिर उभारले.
दरम्यान, डोंबारी समाज बांधवांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात सावतामाळी चौकापासून प्रारंभ झालेली शोभायात्रा तब्बल अडीच तासांनी चाहुरवस्ती येथे नव्याने बांधण्यात आलेल्या त मंदिराजवळ पोहोचली.
मिरवणुकीनंतर होम, मंदिराची वास्तुशांती, गणेशपूजन, मूर्ती प्रतिष्ठापनानंतर लक्ष्मीआई नावाचा जयघोष करीत प्रतिष्ठापना कार्यक्रम झाला. यानिमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाआरतीनंतर, शाकाहारी,तर शुक्रवारी (दि. 29) मांसाहारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.





