पुणे जिल्हा : वैष्णवांना गजरू आनंदे हेलावली सृष्टी

सासवड येथून संत सोपानकाका महाराज पालखीचे प्रस्थान
अमोल बनकर
सासवड – चलारे वैष्णवलो जाऊ पंडरीयेसी ।
प्रेमामृत खुण मागो त्या विलासी ॥
चालिले गोपाळ वाहताती वाकुल्या ।
भरले प्रेमरसे मग ते वाताती टाळीया ॥
दिंड्या गरूडटके मृदंगाचे नाद ।
गाताती विठ्ठलनाम करिताती आल्हाद ॥
प्रावले पंढरी भीमा देखीयेली दृष्टी ।
वैष्णवांवा गजरू आनंदे हेलावली सृष्टी ॥
गजरू गोपाळांचा श्रवणी पाडेयेला ।
शंखचक्र करी विठ्ठल सामोरा आला ॥
कासवदृष्टी न्याहाळीतु रंगी नाचतु पै भणण ।
सोपान म्हणे आम्ही वाळवंटी केला काला ॥
टाळ-मृदंगाच्या तालावर ज्ञानोबा माऊली, तुकाराम व संत सोपानदेवांचा जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू संत सोपानदेव यांच्या पालखीने बुधवारी (दि. 3) पंढरीकडे प्रस्थान ठेवले. संत सोपानकाकांच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा होऊन देऊळवाड्याच्या उत्तर दरवाजातून पालखी दुपारी 12 च्या सुमार बाहेर पडली. यावेळी हजारो भाविकांनी माऊली व सोपानकाकांचा जयघोष केला. फुलांची उधळण केली.
पहाटे काकड आरती, महापूजा व धार्मिक विधी संपन्न झाले. त्यानंतर पहाटेपासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा सासवड येथे मुक्काम असल्याने संत सोपानदेवांच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सकाळी 10 वाजता प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम मानाच्या दिंड्यांना मंदिरात घेण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर मानाच्या दिंडीप्रमुखांचे अभंग संपन्न झाले.
देवघरातून सोपानकाकांच्या पादुका आणून वीणामंडपातील पालखीमध्ये विधिवत स्थानापन्न केल्या. त्यानंतर सोपानदेव देवस्थान ट्रस्ट, संत सोपानकाका सहकारी बँकेच्या वतीने सर्व दिंडीप्रमुखांच्या सत्काराचा कार्यक्रम झाला. पालखीने देऊळवाड्यातून पालखीने हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रस्थान ठेवले. सोपानदेव चौक, छत्रपती शिवाजी महाराज मंडळ चौक, अमर चौक, कन्हैया चौक मार्गे जेजुरी नाका पालखीचा पहिला विसावा पिंपळे या ठिकाणी झाला त्यानंतर पांगारे या ठिकाणी पालखी मुक्कामी विसावली.
सोपानकाका बँकेच्या वतीने आमदार संजय जगताप यांच्या हस्ते सर्व दिंडीप्रमुखांस श्रीफळ देण्यात आले. पालखी प्रस्थान सोहळ्याप्रसंगी देवस्थानचे प्रमुख अॅड. त्रिगुण गोसावी, मंदिरात तहसीलदार विक्रम रजपूत राजवर्धनी जगताप, सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, माजी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, सुहास लांडगे, नंदुकाका जगताप, उपस्थित होते.
सोपानकाका पालखी बरोबर 107 दिंड्या असून पुढे 27 तर मागे 80 दिंड्या राहणार आहेत, अशी माहिती मुख्य विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख त्रिगुण गोसावी यांनी दिली. यावेळी देवस्थानचे चोपदार सिद्धेश शिंदे उपस्थित होते. बुधवारी सकाळी पालखी सोहळ्याचे प्रमुख अॅड. त्रिगुण गोसावी यांच्या घरात सोपानदेव महाराज यांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले.
रथासाठी वढणे यांच्या बैलजोडीला मान
रथासाठी विजय वढणे यांचा बैलजोडीचा मान आहे. तसेच संत सोपानकाका बँकेच्या वतीने फुलांची सजावट करणार आहे. भाविकांनी पालखी खांद्यावर घेऊन सासवड गावातून मिरवत जेजुरी नाक्यापर्यंत आणली. येथे हजारो भाविकांनी पालखीला निरोप दिल्यानंतर हा सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला.





