पुणे जिल्हा : रस्त्यावरील झाडे-झुडपे ठरताहेत यमदूत

खोडद ते साळवाडी रस्त्यावरील स्थिती : ओव्हरटेक करताना अपघात
नारायणगाव – मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निर्माण करण्यात आलेल्याखोडद गावातून साळवाडीकडे जाणार्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने काटेरी झुडपे व इतर झाडांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढलेल्या झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्याने रस्त्याच्या बाजूने असलेल्या साइडपट्टीवरून दुचाकी अथवा चारचाकी वाहन चालकाला गाडी चालवता येत नाही. रस्त्याच्या कडेला काटेरी झाडांची वाढ झालेली असल्याने वाहन चालक शारीरिक इजा होण्याच्या भीतीपोटी मुख्य रस्त्याच्या खाली साइडपट्टीवर न उतरता आपले वाहन मुख्य रस्त्यावरून चालवत असतो. त्यामुळे चालक आपले वाहन ओव्हरटेक करताना अनेक अपघात झाले आहे.
अगोदरच जुन्नर तालुक्यातील रहिवासी बिबट्यांच्या हल्ल्याने त्रस्त झाले आहेत. खोडद-साळवाडी रस्त्यावरून रात्रीच्या वेळी प्रवास करीत असताना वाढलेल्या झाडांमुळे बिबट्याचे अस्तित्व लक्षात येत नसल्याने बिबट्याने अनेकवेळा दुचाकी चालकावर हल्ला केला असल्याच्या घटना घडलेल्या आहेत. प्रशासन मृत्यूची वाट पाहत आहे का? असा प्रश्न खोडद ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तरी प्रशासनाने रस्त्याच्या कडेला वाढलेले झाडांच्या फांद्यांची तातडीने छाटणी करून रस्ता वाहतुकीसाठी खड्डे मुक्त व भयमुक्त करावा अशी मागणी खोडद ग्रामस्थांकडून केली आहे.
खोडद- साळवाडी रस्त्याची पाहणी करणार असून एस आर फंडातून रस्ता दुरुस्तीसाठी व झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी निधी उपलब्ध करण्यात येईल. दोन महिन्यांच्या आत वाढलेल्या झाडांच्या फांद्या व काटेरी झाडेझुडपे छाटण्यात येतील. खोडद ग्रामस्थांची मागणी योग्य असून त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल.
– बाळकृष्ण कोळेकर, कनिष्ठ अभियंता, महाराष्ट्र राज्य, ग्रामीण रस्ते विकास संस्था, पुणे
खोडद साळवाडी रस्त्यावरील प्रवाशांची अडचण विचारात घेऊन ग्रामस्थांच्या वतीने खोडद ग्रामपंचायत कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था पुणे यांना पत्र देणार आहे. प्रशासनाने लवकरात लवकर निधी उपलब्ध करून खोडद-साळवाडी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडांच्या फांद्या तोडून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीसाठी भयमुक्त व चांगला करावा अशी मागणी करणार आहे.
– योगेश शिंदे, सदस्य, खोडद ग्रामपंचायत





