Pune District : गावरान आंब्याची चव दुर्मिळ

इंदापूर : कधीकाळी घराघरात दरवळणारा गावरान आंब्याचा सुगंध, आता इंदापूर तालुक्यात दुर्मिळ होत चालला आहे. उत्पन्न वाढवण्याच्या लालसेने शेतकर्यांनी गावरान आंब्याची झाडे तोडून संकरित व कलमी आंब्यांची लागवड केल्याने पारंपरिक गावरान आंब्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. परिणामी गावरान आंब्याची चव व सुगंध दोन्ही हरवत चालले आहेत.
पूर्वी इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गावात, प्रत्येक शेतात गावरान आंब्याची पन्नास ते शंभर झाडे सहज आढळत असत. आजी-आजोबांनी लावलेली किंवा नैसर्गिकरीत्या उगवलेली ही झाडे आमरायांना देखणं रूप देत असत; मात्र गेल्या काही वर्षांत शेतकर्यांनी गावरान झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड केली. झाडांच्या खाली पिके वाढत नसल्यामुळे व अधिक उत्पन्न देणार्या कलमी जातींच्या झाडांना पसंती मिळाल्यामुळे ही वृक्षतोड वेगाने झाली आहे.
पूर्वी वादळी वार्यानंतर मुले पिशव्या घेऊन आमरायात धाव घेत व गावरान आंब्यांचा पाड वेचण्याचा आनंद लुटत. घरोघरी गव्हाच्या काडावर किंवा भूशावर आंबे पिकवले जात, आणि त्या आंब्यांचा गंध घरात दरवळत असे. पाहुण्यांच्या स्वागतासाठी बादलीभर पाणी आणि टोपलीभर आंब्यांची व्यवस्था केली जात होती; परंतु आज बाजारातून शंभर ते दीडशे रुपये किलो दराने आंबे विकत घेऊन पाहुणचार करावा लागतो.
गावरान आंब्याच्या वृक्षतोडीमुळे शेंद्या, शेप्या, दश्या, तोतापुरी यांसारख्या स्थानिक व पारंपरिक जा ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सध्या बाजारात हापूस, केशर, नीलम, दशेरी या संकरित जातींना ग्राहकांकडून अधिक पसंती मिळत आहे. कलमी आंबे झटपट पिकवण्यासाठी रासायनिक पद्धतींचा वापर होत असल्याने त्यांच्या चवित व गुणवत्ता टिकवण्यात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोग्याच्या दृष्टीने नैसर्गिकरीत्या पिकवलेला गावरान आंबा अधिक लाभदायक मानला जातो.
चव आणि आनंद आठवणीपुरतेच
आजच्या घडीला केवळ गावरान आंब्याची चवच नव्हे, तर पर्यावरणीय समतोल आणि ग्रामीण संस्कृतीशी जोडलेला हा अनमोल वारसाही लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे गावरान आंब्याच्या संवर्धनासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. पूर्वी थोडा आंबट लागलेला आंबा फेकून दिला जात असे. आज मात्र, रासायनिक प्रक्रियेद्वारे झटपट पिकवलेले आंबे महाग दराने विकत घ्यावे लागतात. त्यामुळे जुन्या काळातील गावरान आंब्याची चव आणि आनंद आता केवळ आठवणीपुरतेच उरले आहेत.





