Pune District : माळेगावचे कारभारी २२ जूनला ठरणार

माळेगाव : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे माळेगावची सत्ता स्थापित करण्यासाठी (दि.२२) जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. ही निवडणूक दुरंगी की तिरंगी होणार, याची चर्चा माळेगावच्या शिवारात सुरू झाली आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. बुधवार (दि. २१) ते (दि.२७) मे या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. (दि.२२) जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी प्रकाश अष्टेकर आणि माळेगावचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
(दि.२८) रोजी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी केली जाईल. (दि.२९) ते (दि.१२) जून या कालावधीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. (दि.१३) जून रोजी अंतिम उमेदवारी यादी जाहीर केली जाणार आहे. (दि.२२) जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. यात सभासद कोणाच्या हाती द्यायची याचा कौल देणार आहे. (दि.२४) जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.





