पुणे जिल्हा : इंदापूर तालुक्याचा निकाल 96.51 टक्के

इंदापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये इंदापूर तालुक्याचा एकूण सरासरी निकाल 96.51 टक्के लागला आहे, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये इंदापूर तालुक्यातील 46 शाळांमधील 6 हजार 568 विद्यार्थांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. 80 विद्यार्थी परीक्षेमध्ये गैरहजर होते.
प्रत्यक्षात 6 हजार 488 विद्यार्थ्यांनी तालुक्यातील विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली. यामध्ये 6 हजार 262 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये विशेष प्रावीण्य घेऊन 1 हजार 720 विद्यार्थी, अ श्रेणीत 2 हजार 759 विद्यार्थी, ब श्रेणीत 1 हजार 587 विद्यार्थी व पास श्रेणीत 196 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर 226 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.
इंदापूर तालुक्याची उत्तीर्णचे सरासरी प्रमाण 96.51 टक्के आहे. इंदापूर तालुक्यातील एकूण 46 कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी बारावीची परीक्षा दिली होती. यामध्ये 23 कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के, 18 महाविद्यालयाचा निकाल 90 टक्केपेक्षा जास्त लागला तर 5 कनिष्ठ महाविद्यालय यांचा निकाल 90 टक्के पेक्षा कमी लागला.





