Pune district : घोडनदीवरील बंधाऱ्याचे संरक्षक कठडे तुटले

ग्रामस्थांनी जलपर्णी हटवून वाहतूक केली सुरळीत
जांबूत – दोन दिवसांच्या पावसामुळे घोडनदीला आलेल्या पुराच्या पाण्याने पिंपरखेड – देवगाव हा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली जाऊन बंधाऱ्याचे लोखंडी संरक्षण कठडे तुटून पडल्याने या बंधाऱ्याची धोकादायक झालेली अवस्था जीवघेणी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
घोडनदीला आलेल्या पाण्याच्या प्रवाहाने बंधाऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, दोन दिवस पिंपरखेड – देवगाव गावांना जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. बंधाऱ्याची धोकादायक अवस्था पाहता, या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता आहे. मात्र, पाण्याची तीव्रता कमी झाल्यामुळे बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर अडकलेली जलपर्णी देवगाव ग्रामस्थांनी बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
घोड नदीला तब्बल ४५ हजार क्युसेक्स पाण्याचा मोठा विसर्ग नदीपात्रात सोडल्याने नदीने रौद्ररूप धारण केले होते. नदीच्या प्रचंड पुरामध्ये जलपर्णी वाहून आल्याने दोन्ही बाजूंचे लोखंडी संरक्षण कठडे तुटून पडले, तर काही वाहून गेले. पुराचे पाणी ओसरल्यावर बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर जलपर्णी अडकल्याने पायी प्रवास करणेही कठीण झाले होते.
देवगाव येथील विद्यार्थी व नागरिकांना पिंपरखेड येथे जाण्यासाठी या बंधाऱ्यावरील पुलाचा वापर करावा लागत असल्याने, देवगाव येथील संजय खांडगे, गोविंद बबन खांडगे, दत्तात्रय शिवराम दाभाडे, सुधाकर खांडगे, संतोष खळे, श्रीकांत दळवी, स्वप्निल पवार, यश गावडे या ग्रामस्थांनी दोन तास परिश्रम घेऊन बंधाऱ्यावरील अडकलेले सर्व जलपर्णी काढून वाहतूक सुरू केली आहे.
या पार्श्वभूमीवर, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने प्रशासनाने बंधाऱ्याला कठडे बसवून डागडुजी करावी, अशी मागणी सरपंच दिपाली खांडगे, उपसरपंच दिलीप दाभाडे, पिंपरखेड तंटामुक्तीचे अध्यक्ष दिलीप बोंबे, माजी सैनिक बळवंत बोंबे, पांडुरंग बोंबे, प्रकाश बोंबे, बाळासाहेब बोंबे, संदिप बोंबे पाटील, बाबाजी वरे, मंगेश बोंबे, अक्षय बोंबे, बाबाजी बोंबे, दत्तात्रय बोंबे, स्वप्निल बोंबे, सुधाकर खांडगे, प्रथमेश बोंबे यांनी केली आहे.





