Pune district : काळेवाडीत गरजूंना मिळाला लाभ

महाराजस्व अभियानात योजनांची अंमलबजावणी
दिवे – छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हा लोकाभिमुख उपक्रम शासनाकडून राबविण्यात येत आहे. या अंतर्गत पुरंदर तालुक्यात महसूल सप्ताह आयोजित करण्यात आला यामध्ये शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. यामध्ये महसूल संबंधित तक्रारीचे निराकरण करतानाच शेती औजारे, बँक अनुदान, कृषी योजनांची अंमलबजावणी, महिला बचत गटांना अनुदान, वारस नोंदी अशा विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
काळेवाडी (ता. पुरंदर ) येथे शिबिराचे आयोजन केले होते. आमदार विजय शिवतारे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विकम राजपूत, नायब तहसीलदार संदीप पाटील, गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ, दिवे पंचक्रोशीचे सरपंच रुपेश राऊत, माजी सरपंच योगेश काळे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित झेंडे, कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण,
महसूल नायब तहसीलदार सोनाली वाघ, संजय गांधी योजनेचे महादेव जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम काळे, पशुधन विकास अधिकारी डॉ. अस्मिता सताळकर, प्रतिनिधी, मंडलाधिकारी, महसूल अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिवव्याख्याते प्रा सतीश कुमदाळे यांनी केले. नायब तहसीलदार संदीप पाटिल यांनी आभार मानले.
अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाशी निगडित प्रश्न निकाली काढून यात शेतकरी बांधवासाठी ७/१२ उतारा दुरुस्ती, फेरफार नोंदी, वारस नोंद, जाती, उत्पन्न, राहिवासी दाखले, जुने दस्त नोंदवही व पडताळणी, मालमत्ता नोंदणी, जमिनीचे वर्गीकरण व मोजणी यासह विविध योजनांचे लाभ. देण्यात आले. शासन आपल्या दारी अंतर्गत स्वयं सहायता गट धनादेश वाटप, वय, राष्ट्रीयत्व,
अधिवास दाखले, उत्पन्न दाखले, गोल्डनकार्ड, महिलांना बेबी केअर किट, आभा कार्ड, डिबिटी लाभ, कुपोषित आहार किट, संगणक संच, शेततळे अस्तरीकरण लाभ, कर्जमुक्ती दाखले, स्व.गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, फळपीक विमा, रोटाव्हेटर पेरणी यंत्र, नांगरणी यंत्र, ट्रॅक्टर वाटप, घरकुल लाभ, सिंचन विहीर लाभ, वृक्ष लागवड, लखपती दीदी, सनद यांचे वाटप करण्यात आले.
सर्व घटकांना खऱ्या अर्थाने लाभ
संजय गांधी योजना १८ लाभार्थी, अन्नसुरक्षा योजना ६, भरत झेंडे यांना कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रक्टर, गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात अनुदान अंतर्गत ४, आयुष्यमान कार्ड २५, किल्ले, पुरंदर महिला शेतकरी उत्पादक कंपनी कर्ज मंजुरी, आरोग्य अंतर्गत ५७, कृषी विभाग अंतर्गत ७२, पुरवठा विभाग ४१, त्याचप्रमाणे जातीचा दाखला, उत्पन्न दाखले, सातबारा उतारे, आधारकार्ड यांचे यावेळी मंजुरी पत्र आणि धनादेश यांचे वितरण करण्यात आले.





